मनपातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत महापौरांचे आयुक्तांना पत्र; नागरिकांच्या तक्रारींवरून व्यक्त केली नाराजी
कार्यालयीन वेळेत पूर्ण उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी; नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची घेतली दखल"
प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेतील काही सनदी व शासकीय अधिकारी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी आयुक्तांना लेखी पत्र देत याप्रकरणी तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
जळगाव शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असून नव्याने विकसित होणाऱ्या वसाहती, उपनगरे आणि वाढत्या नागरी सुविधांच्या मागण्यांमुळे नागरिकांची मनपा कार्यालयात ये-जा वाढली आहे. अशा परिस्थितीत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची कामे रखडत असल्याच्या तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या आहेत.
महापौरांनी पत्रात नमूद केले आहे की, शनिवार-रविवार किंवा सलग शासकीय सुट्ट्या येण्यापूर्वी काही अधिकारी कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालय सोडून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच सुट्टीनंतरच्या दिवशी काही अधिकारी उशिरा कार्यालयात येत असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.
अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे विविध विभागांतील प्रस्ताव, परवानग्या, दाखले आणि नागरिकांशी संबंधित दैनंदिन कामांमध्ये विलंब होत असून नागरिकांना वारंवार मनपा कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याची बाब महापौरांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
याप्रकरणी मनपातील सर्व सनदी व शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ उपस्थित राहावे तसेच शासकीय सुट्ट्यांच्या निमित्ताने कार्यालयीन वेळेपूर्वी कार्यालय सोडू नये, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी महापौरांनी आयुक्तांकडे केली आहे.
महापौरांच्या या पत्रानंतर मनपा प्रशासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या तक्रारींवर काय उपाययोजना करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.