नाशिक जिल्ह्यात नाथपंथी समाजाच्या दफनभूमीसाठी ४० गुंठे जागा मंजूर
दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नाला मिळाला मार्ग; पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकांचा समाजातर्फे गौरव
नाशिक : नाथपंथी समाजाच्या दफनभूमीसाठी पंचवटी परिसरातील स्मशानभूमीलगत ४० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने समाजाचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. या कामासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरसेविका चंद्रकला धुमाळ, प्रियंका माने आणि नगरसेवक अजिंक्य साने यांचा नाथपंथी समाजाच्या वतीने भगवान परशुराम संकुल, तारवालानगर येथे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला दिगंबर धुमाळ, धनंजय माने यांच्यासह समाजातील पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी गौरव इंगळे होते. सत्काराला उत्तर देताना अॅड. अजिंक्य साने यांनी नाथपंथाची परंपरा, गुरू-शिष्य संस्कृती आणि समाजाच्या योगदानाविषयी माहिती दिली. गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून पंचवटी तसेच जुने नाशिक परिसरातील दफनभूमीचा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दिगंबर धुमाळ यांनी नाथपंथातील राष्ट्रभक्ती, गुरुभक्ती आणि एकनिष्ठतेच्या परंपरेचा उल्लेख केला. समाजाची संख्या वाढत असल्याने भविष्यात दफनभूमीसाठी जागेची गरज आणखी वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले. उपलब्ध जागेचा नियोजनबद्ध वापर करून पक्क्या समाध्या न बांधता पुनर्वापराची पद्धत स्वीकारावी, अशी सूचना धनंजय माने यांनी केली.
संस्थेचे अध्यक्ष रोहित कानडे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या आतापर्यंतच्या कामकाजाची तसेच आगामी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी तीनही नगरसेवकांना समाजाच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दफनभूमीच्या प्रश्नासाठी सहकार्य व पाठपुरावा करणारे ॲड. गजानन जाधव, ॲड. सुदेश जाधव आणि श्री. कानडे यांच्याबद्दलही समाजबांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली. ॲड गजानन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ॲड.भूषण शिंदे यांनी यादी वाचन केले, तर बाळकृष्ण जाधव यांनी आभार मानले.