Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

पहिल्याच पावसात कोट्यवधींचा बायपास उघडा पडला! तरसोद–पाळधी महामार्गावरील पूल धोकादायक; पिलर ढासळले, रस्त्याला भेगा

अशिक्षित मजूर सरस की, डिग्रीधारक अभियंते?


प्रतिनिधी जळगाव : शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला तरसोद–पाळधी बायपास महामार्ग पहिल्याच जोरदार पावसात निकृष्ट दर्जाच्या कामाचे उदाहरण ठरला आहे. अवघ्या वर्षभरापूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या दोन पदरी बायपासवरील पुलाच्या पिलरभोवतीची माती व वाळू वाहून गेल्याने पिलर उघडे पडले आहेत, तर रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. परिस्थिती इतकी गंभीर झाली की संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) तातडीने बायपासवरील दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवली आहे.

सुदैवाने ही घटना ऐन गर्दीच्या वेळी घडली नाही. अन्यथा पुलाचा भाग खचून मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ तांत्रिक बिघाड नसून बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा असल्याची चर्चा सुरू आहे.

 

मुंबई–नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या बायपासचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत खासगी ठेकेदाराकडून करण्यात आले होते. मात्र पहिल्याच मुसळधार पावसात पुलाच्या संरक्षण भिंतीलगतची माती वाहून गेली, पिलर उघडे पडले आणि रस्त्याच्या संरचनेला तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुलाचा पाया कमकुवत झाल्याने विशेषतः अवजड वाहनांमुळे संपूर्ण पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पाळधीजवळ दोन्ही बाजूंनी वाहतूक तातडीने बंद करण्यात आली असून सर्व वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहेत. यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची शक्यता वाढली आहे.

या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, “बांधकाम क्षेत्रातील अनेक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित कामगारही वर्षानुवर्षे टिकणारी मजबूत कामे करतात; मग उच्च शिक्षण घेतलेले अभियंते, तांत्रिक सल्लागार आणि कोट्यवधी रुपयांचे कंत्राट हाताळणाऱ्या यंत्रणेकडून एवढ्या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावर असे निकृष्ट काम कसे झाले?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला आहे.

कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पाची अवस्था पहिल्याच पावसात झाल्याने प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदार यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता उभारण्याची जबाबदारी असताना निकृष्ट कामामुळे जनतेचा पैसा अक्षरशः पाण्यात गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button