फत्तेपूरची घटना आणि समाजाला पडलेला प्रश्न : पडद्यावरील काल्पनिक दृश्य आता वास्तवात उभी!?
प्रतिनिधी: जळगाव जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात पोलिसांनी १५ पैकी १४ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास सुरू असताना या घटनेने केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच नव्हे, तर समाजाच्या बदलत्या मानसिकतेचाही गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर चित्रित करून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा आरोप आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे—समाज नेमका कुठे चालला आहे?
काही वर्षांपूर्वी चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे गुन्हे, हिंसा, अश्लीलता आणि विकृत मानसिकतेची दृश्ये ही केवळ मनोरंजनाचा भाग मानली जात होती. मात्र आज त्याच प्रकारच्या घटना आपल्या आसपास वास्तवात घडताना दिसत आहेत. सामाईक अत्याचार, अल्पवयीनांकडून होणारे गुन्हे, ड्रग्स व्यसन, विकृत व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर प्रसारित करणे अशा घटना केवळ कायद्याचा प्रश्न नसून समाजाच्या मानसिकतेचा गंभीर इशारा आहेत.
आज इंटरनेट प्रत्येकाच्या हातात आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर कोणत्याही प्रकारचा मजकूर, व्हिडिओ किंवा दृश्य सहज उपलब्ध होते. त्यातील चांगल्या गोष्टींसोबतच हिंसक, अश्लील आणि विकृत आशयही तितक्याच वेगाने तरुणांपर्यंत पोहोचत आहे. विवेक न वापरता अशा गोष्टींचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती वाढत असल्याचे अनेक घटनांमधून दिसून येते.
प्रत्येक मोठ्या घटनेनंतर बातम्या होतात, सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो, पोलिस आरोपींना अटक करतात, कोठडी त्यानंतर चार्जशीट नंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते. पण प्रश्न कायम राहतो—अशा घटना घडूच नयेत यासाठी प्रयत्न कोण करणार?
याचे उत्तर केवळ पोलिस किंवा न्यायव्यवस्था नाही. त्यासाठी कुटुंब, शाळा, महाविद्यालये, समाज, माध्यमे आणि प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर संस्कार, महिलांचा सन्मान, सामाजिक मूल्ये आणि इंटरनेटचा जबाबदारीने वापर यांचेही शिक्षण देणे तितकेच आवश्यक आहे.
चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरील प्रत्येक दृश्य वास्तवात उतरविण्याची गोष्ट नसते. मनोरंजन आणि वास्तव यामधील सीमारेषा पुसली जाऊ लागली, तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात.
तंत्रज्ञान हे वरदान आहे; पण त्याचा गैरवापर झाला तर ते अभिशाप ठरते. म्हणूनच पालकांनी मुलांच्या ऑनलाइन सवयींकडे लक्ष देणे, शैक्षणिक संस्थांनी नैतिक शिक्षणाला प्राधान्य देणे आणि समाजाने विकृत प्रवृत्तीला वेळेत रोखणे ही काळाची गरज आहे.फत्तेपूरची घटना ही केवळ एका गुन्ह्याची नोंद नाही; ती समाजासाठी धोक्याची घंटा आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर, महिलांविषयीची विकृत मानसिकता आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाण्याची प्रवृत्ती यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती नाकारता येणार नाही.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे अशा विकृत प्रवृत्ती निर्माणच होणार नाहीत, अशी सामाजिक जाणीव निर्माण करणे. कारण सुरक्षित समाज केवळ कायद्याने नव्हे, तर सुदृढ संस्कार, नैतिक मूल्ये आणि सामूहिक जबाबदारीने घडतो