आरटीओ विभागाचा खासगी एजंट ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबीची कारवाई
दिव्यांगाच्या कार पासिंगसाठी आरटीओ विभागाच्या नावाने लाच; एजंट रंगेहाथ पकडला
प्रतिनिधी जळगाव : नवीनच घेतलेल्या वाहनाच्या कायमस्वरूपी पासिंगसाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारणाऱ्या खासगी एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. १७) रंगेहाथ पकडले. योगेश रामभाऊ पाटील (वय ३१, व्यवसाय एजंट, खांदेश मोटर्स शोरूम, जळगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत जळगाव येथील एका खासगी वकिलाने काही दिवसापूर्वी तक्रार दिली होती. तक्रारदार हे दोन्ही पायांनी दिव्यांग आहेत. त्यांनी दि. ९ जुलै २०२६ रोजी खांदेश मोटर्स शोरूममधून कार खरेदी केली होती. सदर कारची आरटीओ कार्यालयात सीआरटीएम नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर कायमस्वरूपी पासिंगसाठी तक्रारदार दि. ३ ऑगस्ट रोजी आरटीओ कार्यालयात गेले होते.
तक्रारदार दिव्यांग असल्याने त्यांच्या कारचे कायमस्वरूपी पासिंग करून देण्यासाठी आरटीओ कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काम करून देतो, असे सांगून संशयित आरोपी एजंट योगेश पाटील याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने तडजोडीची विनंती केल्यानंतर लाचेची रक्कम ८ हजार ५०० रुपयांवर ठरली.
यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी सापळा रचण्यात आला. बजाज टी.व्ही.एस. शोरूम, इच्छादेवी चौक, जळगाव येथे आरोपी योगेश पाटील याने तक्रारदाराकडून ७ हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, आणि पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पो.ह.वा. सुनील वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.