जळगावच्या हरित भविष्यासाठी महिला हाऊसिंग ट्रस्ट च्या आणि मनपाच्या सहकार्याने १९ प्रभागांतील नियोजित जागेवर वृक्षारोपणाचे नियोजन.
४५ अंशांपार जाणाऱ्या जळगावच्या उन्हाला दीर्घकालीन उत्तर; ‘हरित जळगाव शहर’ला सोमवारपासून मिळणार गती
प्रतिनिधी जळगाव : जळगावचे वाढते तापमान, वेगाने होणारे शहरीकरण आणि घटते हरित क्षेत्र लक्षात घेऊन महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या सहकार्याने जळगाव शहर महानगरपालिकेने ‘हरित जळगाव शहर’ उपक्रमाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी शहराचा Climate Action Plan आणि Heat Action Plan प्रकाशित करण्यात येणार आहे.
जळगावचे तापमान यंदा मे महिन्यात ४५.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे उष्णतेचा सामना करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन नियोजनावर भर देण्यात येत आहे.
महानगरपालिकेने महिला हाउसिंग ट्रस्ट (MHT), अहमदाबाद यांच्या संशोधन, अनुभव आणि तांत्रिक सहकार्याने हे दोन्ही आराखडे तयार केले आहेत. शहरातील पारंपरिक ‘Grey Infrastructure’सोबत ‘Green Infrastructure’ विकसित करण्यावर या नियोजनात भर देण्यात आला आहे.
‘हरित जळगाव शहर’ अंतर्गत १९ प्रभागांतील प्रत्येक जागा निश्चित करण्यात आल्या असून, येथे टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण व हरित क्षेत्र विकास केला जाणार आहे. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धन, स्थानिक वृक्षप्रजाती, जलसंधारण, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि खुल्या जागांचे दीर्घकालीन संरक्षण यावर भर राहणार आहे. दरम्यान, हायवेजवळील TM नगर ग्राउंड परिसरात वृक्षारोपण सुरुवात करण्यात येणार असून, त्यासाठीची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. या ठिकाणी हरित क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका स्तरावर नियोजन केले जात आहे. शहरातील उपलब्ध मोकळ्या जागांचे आतापासूनच संरक्षण व नियोजन करून भविष्यातील उष्णता आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. ‘हरित जळगाव शहर’मधून शहराच्या विकासात काँक्रीटसोबत हिरवाईलाही महत्त्व देण्याची दिशा निश्चित करण्यात आली आहे.
महापालिकेच्या ‘वृक्षारोपण–२०२६’ नियोजनपत्रकात वृक्षारोपणासाठी विविध ठिकाणांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये राज मालती नगर ,कनक नगर भागातील मनपा कार्यालय, शामाप्रसाद उद्यान, पारेख पार्क उद्यान, विवेकानंद नगर भागातील जागा, महादेव मंदिर परिसर, रिंगरोड परिसर, स्नेह नगर, काशीनगर, स्टेट बँक कॉलनी, झंकार हॉटेल परिसर, राम नगर आदी ठिकाणांचा समावेश आहे.
या ठिकाणांसाठी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी आणि समन्वयाची जबाबदारीही नियोजनपत्रकात निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे वृक्षारोपणानंतर त्याच्या देखभाल-संवर्धनाची जबाबदारी कोणाकडे राहणार, याचे नियोजन करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून करण्यात येत आहे.