महापौर दीपमाला काळे यांचा धडक दौरा;अयोध्या नगर-ऑटो नगरच्या नागरी समस्यांवर अधिकाऱ्यांची कानउघाडणी.

जळगाव प्रतिनिधी:शहरातील वाढत्या नागरी समस्यांची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी अयोध्या नगर व ऑटो नगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नागरिकांनी गटारी तुंबणे, सांडपाणी घरात शिरणे, रस्त्यांच्या कामातील विलंब व स्वच्छतेबाबतच्या तक्रारी मांडल्या.अयोध्या नगरातील अशोक नगर परिसरात गटारांच्या समस्येची गंभीर दखल घेत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. पुढील आठवड्यापर्यंत नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात जाणार नाही, यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
ऑटो नगरमध्ये रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून त्यांनी संबंधित अधिकारी व अभियंत्यांना धारेवर धरत नियोजनाच्या अभावावर नाराजी व्यक्त केली. तसेच महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.दरम्यान, महिला नागरिकांनी आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर महापौरांनी तुंबलेल्या गटारींची त्वरित साफसफाई करण्याचे कडक निर्देश दिले. नागरिकांच्या तक्रारींवर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन निर्णय घेतल्याने महापौरांचा हा दौरा लक्षवेधी ठरला.