ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा


जळगाव, प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील धुरखेडे गावातील ३५ पुनर्वसनधारक कुटुंबांनी पुनर्वसनासाठी मंजूर भूसंपादन प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे. पुढील १५ दिवसांत जमीन मोजणी व भूसंपादन प्रक्रिया सुरू न झाल्यास सर्व कुटुंबे जळगाव येथे आमरण उपोषणास बसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध वेळा जमीन मोजणीचे कार्यक्रम निश्चित करण्यात आले होते. मात्र, अधिकारी घटनास्थळी येऊन कोणतीही प्रत्यक्ष मोजणी न करता परत गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याची भावना पुनर्वसनधारकांनी व्यक्त केली.

शासनाने यापूर्वी शासकीय जमिनींची पाहणी केली असता त्या पुनर्वसनासाठी अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर खासगी जमिनीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून २०१८ मध्ये सुधारित भूसंपादन प्रस्तावही मंजूर करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

धुरखेडे गावाची विद्यमान वस्ती तापी नदीकाठावर असून परिसर मोठ्या नाल्यांनी व दऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होतो. याशिवाय घरांमध्ये विषारी साप व विंचू निघत असल्याने नागरिक भयग्रस्त वातावरणात राहत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. पावसाळ्यात घराची भिंत कोसळून पार्वताबाई भागवत अटकाळे (वय ७२) यांचा मृत्यू झाल्याची घटना नमूद करत, गंभीर परिस्थितीनंतरही प्रशासनाने दखल घेतली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.पुनर्वसनधारकांनी जमीन मोजणीची तारीख तातडीने जाहीर करून पोलीस बंदोबस्तात मोजणी प्रक्रिया राबवावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा १५ दिवसांनंतर सर्व ३५ कुटुंबे जळगाव येथे आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button