आरटीओच्या नवीन फिटनेस व लायसन्स टेस्ट ट्रॅकवरील मूलभूत सुविधांचा अभाव; मनसेकडून आंदोलनाचा इशारा
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आरटीओ विभागाच्या वाहन फिटनेस टेस्टिंग ट्रॅक आणि पक्क्या लायसन्स चाचणी ट्रॅकवर नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आरटीओ प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसेने केला असून, आठ दिवसांत व्यवस्था न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, जळगाव जिल्ह्यात सध्या उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून उष्णतेची लाट जाणवत आहे. अशा परिस्थितीत दररोज शेकडो वाहन चालक, वाहन मालक तसेच लायसन्स चाचणीसाठी येणारे नागरिक या ट्रॅकवर येत असतात. मात्र, या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची, सावलीत बसण्याची आणि स्वच्छतागृहांची कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ट्रॅकवर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शहरापासून हा परिसर दूर असल्याने साध्या गरजांसाठीही लोकांना परत शहरात जावे लागते. तसेच वाहन चाचणीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असताना बसण्यासाठी किंवा सावलीसाठी कोणतीही वेटिंग शेड नसल्याने नागरिकांना कडक उन्हात उभे राहावे लागते. त्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचे मनसेने सांगितले.
याशिवाय महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने विशेषतः महिलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे मनसेने म्हटले आहे. कडक उन्हामुळे एखाद्या नागरिकाला उष्माघाताचा त्रास झाल्यास त्यास सर्वस्वी आरटीओ प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.
मनसेने प्रशासनाकडे ट्रॅकवर त्वरित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, नागरिकांसाठी प्रशस्त व सावलीची शेड उभारणे तसेच तातडीने फिरते किंवा कायमस्वरूपी स्वच्छतागृह उपलब्ध करून देणे, या प्रमुख मागण्या केल्या आहेत. या मागण्या आठ दिवसांत पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या शैलीत तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, खुशाल ठाकूर, युसुफ खाटीक, अश्फाक शहा, आली खाटीक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.