Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

‘ऑपरेशन ड्रॉप केस’ यशस्वी;२० लाख रोख रक्कम, सोने, शस्त्रे आणि संशयास्पद वस्तू हस्तगत

२०० पोलिसांचा पहाटे हल्लाबोल; मुक्ताईनगर परिसरातील गुन्हेगारीवर निर्णायक प्रहार


जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – सोशल मीडियाच्या माध्यमातून दुर्मिळ व मौल्यवान वस्तू विक्रीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कथित ‘ड्रॉप केस’ रॅकेटविरोधात जळगाव पोलिसांनी शुक्रवारी पहाटे मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई केली. मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालगोटा, हलखेडा, माधापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या पाच गावांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ मोहिमेत ५५ रेकॉर्डवरील आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, या गावांमधून काळी हळद, नागमणी, रेड मर्क्युरी, सुलेमानी दगड, जुने सोने, दुर्मिळ धातू आदींच्या नावाखाली सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित करून देशभरातील लोकांना आमिष दाखवले जात होते. त्यानंतर संबंधित व्यक्तींना गावात बोलावून बनावट वस्तू दाखवून किंवा थेट लुटमार करून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे अनेक प्रकरणांत समोर आले आहे.विशेष म्हणजे, काही प्रकरणांत पीडितांना धमकावण्यासाठी वन्यजीवांशी संबंधित बनावट पुरावे वापरल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे अनेक पीडित तक्रार करण्यास धजावत नसल्याचे समोर आले आहे.

 

मागील तीन वर्षांत या परिसरात दरोडा, खुनासह दरोडा, खून, जबरी चोरी, फसवणूक आणि सरकारी कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांसह एकूण डझनावधी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. अल्प लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नोंदी आढळणे ही बाब पोलिसांसाठी चिंतेची ठरली होती.

या विशेष मोहिमेत पोलिसांनी सुमारे २० लाख रुपयांची रोख रक्कम, ३०० ग्रॅम सोने, २.५ किलो चांदी, दोन हरिणाच्या कातड्या, चिल्ड्रन्स बँक करन्सी, कलर प्रिंटर, नागमणी व रेड मर्क्युरीसारख्या कथित वस्तू, ३० मोबाईल हँडसेट, चार चारचाकी वाहने, सहा दुचाकी, एक गावठी कट्टा आणि दोन चॉपर जप्त केले आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या कारवाईत विविध पोलीस ठाण्यांचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सुमारे २०० पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. पहाटेच्या वेळी एकाच वेळी सर्व गावांमध्ये धाड टाकून संशयितांवर कारवाई करण्यात आली.

ऑपरेशन ड्रॉप केस’ ही केवळ गुन्हेगारांविरोधातील कारवाई नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून चालणाऱ्या फसवणुकीच्या साखळीवर प्रहार मानला जात आहे. ग्रामीण भागातून देशव्यापी फसवणुकीचे जाळे उभे राहू शकते, याची जाणीव या प्रकरणाने करून दिली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात भविष्यातही सातत्याने विशेष मोहिमा राबविल्या जाणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button