इच्छादेवी चौक अपघात : कारचालकाचे ९ तासांनी रक्तनमुने; पोलीस प्रशासनाकडे ब्रेथ अॅनालायझर उपकरण असताना तात्काळ अल्कोहोल चाचणी का झाली नाही?”नागरिकांचा सवाल
चलनासाठी ब्रेथ अॅनालायझर, पण भीषण अपघातानंतर उपकरण गायब?
प्रतिनिधी जळगाव : बुधवारी सकाळी इच्छादेवी चौकात झालेल्या भीषण अपघातात निष्पाप दुचाकीस्वार लीलाधर मंगल पाटील (रा. आहुजा नगर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर पादचारी कन्हैया राजेश गारंगे (रा. कंजरवाडा) गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. मात्र अपघाताइतकीच गंभीर बाब म्हणजे, अपघातानंतर कथित आरोपींचे रक्तनमुने तब्बल नऊ तासांनी घेण्यात आल्याचा आरोप होत असून, त्यामुळे पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जतीन संजय बोरसे (वय २१, रा. जिजाऊ नगर), पुष्कर विशाल घोरपडे (वय २१), ईशान विद्यासागर सिंग (वय १८) आणि गौरव संजय बडगुजर (वय १८) हे मंगळवारी रात्री कारमधून फिरत होते. बुधवारी पहाटे त्यांनी कंजरवाडा परिसरातून मद्य खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते नशिराबाद येथील एका ढाब्यावर जाऊन पुन्हा मद्यपान करून जळगावकडे निघाले.
सकाळी सुमारे सहा वाजता इच्छादेवी चौकात कार अतिवेगाने चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडर ओलांडून पलटी झाली आणि समोरून दुचाकीवरून जाणारे लीलाधर पाटील यांना चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर कन्हैया गारंगे गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर कारमधील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र सर्वात मोठा प्रश्न असा उपस्थित होत आहे की, रस्त्यावर नियमित तपासणीदरम्यान ट्रॅफिक पोलीस वाहनचालकांची ब्रेथ अॅनालायझरद्वारे तात्काळ अल्कोहोल तपासणी करतात, मग जीवघेण्या अपघाताच्या प्रकरणात हेच उपकरण तत्काळ का वापरले जात नाही ?
सामान्य वाहनचालकाने मद्यपान केले असल्याचा संशय आला, तर ट्रॅफिक पोलीस जागेवरच ब्रेथ अॅनालायझर मशीनमध्ये फुंकर मारून अल्कोहोलची तपासणी करतात आणि त्यानुसार कारवाई करतात. मग गंभीर अपघातानंतर संशयित चालकाला पोलीस ताब्यात घेतल्यानंतर त्याची तात्काळ ब्रेथ अॅनालायझरने तपासणी का करण्यात आली नाही? रक्तनमुने घेण्यासाठी तब्बल नऊ तासांचा विलंब का झाला? या विलंबामुळे पुराव्यांवर परिणाम होण्याची शक्यता पोलिसांनी विचारात घेतली होती का? असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे की, ड्रंक अँड ड्राईव्हच्या संशयित अपघातांमध्ये ब्रेथ अॅनालायझरचा तात्काळ वापर केल्यास प्राथमिक पुरावा लगेच उपलब्ध होऊ शकतो. त्यानंतर वैद्यकीय तपासणी व रक्तनमुने घेण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे करता येते. मग अशी पद्धत या प्रकरणात का अवलंबली गेली नाही? या प्रकरणानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून एक तीव्र सवाल उपस्थित केला जात आहे.” वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस ब्रेथ अॅनालायझर मशीनचा तात्काळ वापर करतात. मग एखादा भीषण अपघात घडल्यावर, जिथे मद्यपानाचा संशय आहे, त्याच ब्रेथ अॅनालायझर मशीनचा तात्काळ वापर का केला जात नाही?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या अपघातात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला असून दुसरा नागरिक मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर तपासातील प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आवश्यक आहे. अन्यथा, आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय अधिकच बळावेल आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होईल.