प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे जागतिक छायाचित्रण दिवस साजरा
जळगाव, दि. १९ : प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे आज, १९ ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिवस साजरा करण्यात आला. शहरातील केमिस्ट भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, जैन उद्योग समूहाच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, कॉन्ट्रॅक्टर संभाजीराव जाधव, प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनचे अध्यक्ष संधिपाल वानखेडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांचे पूजन करण्यात आले. तसेच प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
छायाचित्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी : महापौर दीपमाला काळे
धकाधकीच्या जीवनात छायाचित्रकारांची धावपळ प्रचंड वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येक छायाचित्रकाराने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला महापौर दीपमाला काळे यांनी दिला. तसेच भविष्यात प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या उपक्रमासाठी महापालिकेतर्फे वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सुमित देशमुख, हेमंत पाटील जळगावकर, अभिजीत पाटील, सचिन पाटील, अरुण इंगळे, प्रकाश लिंगायत, जुगल पाटील, पांडुरंग महाले, भूषण पाटील, धर्मेंद्र राजपूत, भूषण हंसकर, गोकुळ सोनार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील यांनी केले. यावेळी आजी-माजी वृत्तपत्र छायाचित्रकार, डिजिटल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींसह शहरातील इतर फोटोग्राफर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
