Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीय

सुट्टीच्या दिवशीही आयुक्त जीवने मैदानात; गोलानी मार्केट स्वच्छतेने व्यापाऱ्यांना दिलासा, आता फुले मार्केटकडे लक्ष देण्याची व्यापाऱ्यांची मागणी!


जळगाव : शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने घेत महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही प्रत्यक्ष मैदानात उतरून गोलानी मार्केटमध्ये स्वच्छता अभियान राबविले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकासह त्यांनी मार्केटची पाहणी केली, स्वच्छतेच्या कामावर लक्ष ठेवले आणि आवश्यक त्या सूचना दिल्या. आयुक्तांच्या या प्रत्यक्ष सहभागाचे जळगावकर नागरिकांसह व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे.

केवळ कार्यालयात बसून आदेश देण्याऐवजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करण्याची आयुक्त जीवने यांची कार्यपद्धती सकारात्मक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असतानाही त्यांनी शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य दिल्याने त्यांच्या कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गोलानी मार्केटप्रमाणेच शहरातील इतर प्रमुख बाजारपेठांच्या प्रश्नांकडेही आयुक्तांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. विशेषतः फुले मार्केटमध्ये आयुक्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांची पाहणी करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.

गोलानी मार्केटमधील स्वच्छतेसोबतच येथील पार्किंगचा गंभीर प्रश्न मार्गी लावण्याची अपेक्षाही नागरिक व व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना वाहनतळाची योग्य सुविधा उपलब्ध झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊन बाजारपेठेतील व्यवहार अधिक सुलभ होण्यास मदत होईल.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या महासभेत आयुक्त जीवने यांनी आपल्या कामकाजाच्या शैलीत शेरो-शायरीचा वापर करत सभागृहातील वातावरण हलकेफुलके ठेवत विविध विषय हाताळले होते. प्रशासकीय कामकाजासोबतच संवादाची वेगळी शैली जपणाऱ्या त्यांच्या या पद्धतीचीही शहरात चर्चा आहे.

एकंदरीत, शहरातील प्रश्न केवळ कागदोपत्री न ठेवता प्रत्यक्ष मैदानात उतरून त्यावर काम करण्याची भूमिका आयुक्त जीवने यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. गोलानी मार्केटनंतर आता फुले मार्केटसह शहरातील इतर प्रमुख बाजारपेठांच्या स्वच्छता, पार्किंग आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा जळगावकर व्यक्त करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button