ताज्या बातम्या

मनपाच्या २३ शाळांमध्ये केवळ ७० नवीन प्रवेश; पटसंख्या वाढविण्याचे शिक्षण विभागासमोर आव्हान


जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असले, तरी यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे चित्र समोर आले आहे. महापालिकेच्या २३ शाळांमध्ये १३९ शिक्षक कार्यरत असताना आतापर्यंत अवघे ७० नवीन विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत.

महानगरपालिकेच्या हद्दीत १२ मराठी, १० उर्दू आणि १ हिंदी माध्यमाची शाळा कार्यरत आहे. मागील शैक्षणिक वर्षात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ८२१, तर उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ३ हजार ७९५ विद्यार्थी शिक्षण घेत होते. मात्र यंदा विशेषतः इयत्ता पहिलीच्या प्रवेशसंख्येत घट झाल्याने एकूण विद्यार्थीसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी महानगरपालिकेकडून मोफत गणवेश, बूट, दप्तर, पोषण आहार यांसह विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अनेक उपक्रमही राबविण्यात येत आहेत. तरीही अपेक्षित प्रमाणात प्रवेश होत नसल्याने शिक्षण विभागाची चिंता वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी शिक्षकांची बैठक घेऊन प्रवेश अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले आहेत. परिसरनिहाय प्रवेश शिबिरे, पालक-शिक्षक संवाद मेळावे, जनजागृती मोहीम तसेच विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करणारे विविध उपक्रम आयोजित करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच बालवाड्यांमध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सिनिअर केजीचे वर्गही सुरू करण्यात आले असून या नव्या उपक्रमांमुळे आगामी काळात प्रवेशसंख्या वाढेल, अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button