मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी पाळधीत एसआयआर अभियानाला भरघोस प्रतिसाद,
मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी पाळधीत एसआयआर अभियानाला भरघोस प्रतिसाद,पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची शिबिरांना भेट;
प्रतिनिधी पाळधी : मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाला पाळधी परिसरात नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक येथे आयोजित विशेष शिबिरांमध्ये दिवसभर मतदारांनी उपस्थित राहून आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेमुळे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामाला अधिक गती मिळाली आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पाळधी खुर्द येथील शासकीय विश्रामगृह आणि पाळधी बुद्रुक येथील श्रीराम मंदिर परिसरातील शिबिरांना भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत प्रत्येक पात्र मतदाराने निर्धारित मुदतीत एसआयआर प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले. लोकशाही व्यवस्थेसाठी अचूक व अद्ययावत मतदार यादी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमादरम्यान युवा नेते प्रतापराव पाटील दिवसभर शिबिरस्थळी उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेवर लक्ष ठेवत होते. अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, पडताळणी तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी त्यांनी बीएलओ (Booth Level Officer) आणि बीएलए (Booth Level Agent) यांच्याशी सातत्याने समन्वय साधला. शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने या विशेष शिबिरांचे नियोजन करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत दोन्ही शिबिरस्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराला अर्ज भरण्यापासून आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यापर्यंत सहकार्य केले. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पाळधी परिसरातील सुमारे ४० ते ५० टक्के एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली असून, २५ जुलैपर्यंत शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील काही दिवस शिवसेना, युवासेना आणि जीपीएस मित्र परिवाराचे कार्यकर्ते घराघरांत जाऊन जनजागृती करणार आहेत.
यावेळी प्रतापराव पाटील म्हणाले, “एसआयआर प्रक्रिया प्रत्येक मतदारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास भविष्यात मतदानाचा घटनात्मक हक्क धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आवश्यक कागदपत्रांसह आपली नोंदणी पूर्ण करून मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवावा.”
ते पुढे म्हणाले की, पाळधी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी उर्वरित पात्र मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. प्रत्येक मतदाराचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी जनजागृती मोहीम अधिक व्यापक केली जाणार आहे.
दरम्यान, ज्या नागरिकांची एसआयआर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी गुरुवार, दि. १६ जुलै रोजी पुन्हा विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पात्र मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतापराव पाटील यांनी केले.
यावेळी धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, माजी सरपंच संजूभैया देशमुख, उद्योजक अनिलभैया कासट, उपसरपंच निसार देशमुख, तसेच शिवसेना, युवासेना, जीपीएस मित्र परिवाराचे पदाधिकारी, बीएलओ, बीएलए आणि परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि प्रशासनाच्या समन्वयामुळे पाळधी परिसरातील एसआयआर अभियानाला वेग मिळाला असून, प्रत्येक पात्र मतदाराचा घटनात्मक मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्याच्या दिशेने ही मोहीम प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.