जळगावकरांसाठी मोठा दिलासा ! मनपाचा टोल-फ्री तक्रार निवारण क्रमांक १३ जुलैपासून सुरू! आपल्या समस्या घर बसल्या नोंदवा.
प्रतिनिधी : शहरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन नागरी समस्या व तक्रारींसाठी महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत, तसेच त्यांचा वेळ व श्रम वाचावेत या उद्देशाने जळगाव महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापौर सौ. दीपमाला मनोज काळे यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी टोल-फ्री तक्रार निवारण सेवा सुरू करण्यात येत असून, ही सेवा १३ जुलै २०२६ पासून कार्यान्वित होणार आहे.या उपक्रमांतर्गत नागरिकांना घरबसल्या त्यांच्या विविध नागरी तक्रारी व समस्या नोंदविता याव्यात यासाठी १८०० २३३ ००१५ हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर नोंदविण्यात आलेल्या तक्रारी संबंधित विभागाकडे तत्काळ वर्ग करण्यात येतील. त्यानंतर संबंधित विभागाकडून तक्रारींचे जलदगतीने निराकरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार नोंदविण्याची गरज कमी व्हावी, नागरिकांचा बहुमोल वेळ वाचावा आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी व्हावे, हा या सेवेचा प्रमुख उद्देश असल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.
महापौरांनी शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, १३ जुलै २०२६ पासून सुरू होणाऱ्या या टोल-फ्री सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपल्या नागरी तक्रारी व समस्या १८०० २३३ ००१५ या टोल-फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात.