ताज्या बातम्या

सेवा पुस्तिकेतील तफावत की प्रशासनाचा निष्काळजीपणा? जळगाव मनपात नव्या चर्चेला उधाण!

सेवानिवृत्तीपूर्वी सेवा पुस्तिकेवर संशय; उदय पाटील प्रकरणात नवे प्रश्न


प्रतिनिधी:  जळगाव महानगरपालिकेत ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असलेले आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त उदय मधुकर पाटील यांच्याबाबत माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या सेवा पुस्तिकेतील काही बाबींमुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सेवा पुस्तिका ही कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचाऱ्याची अधिकृत आणि मूलभूत नोंद मानली जाते. कर्मचाऱ्याच्या नियुक्तीपासून ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा नोंदी, पदोन्नती, वेतनवाढ, शिस्तभंग कारवाई, दंड, विशेष नोंदी आणि इतर प्रशासकीय बाबी यामध्ये नमूद केलेल्या असतात. त्यामुळे सेवा पुस्तिका ही संबंधित कर्मचाऱ्याच्या सेवाकाळाचा अधिकृत दस्तऐवज म्हणून ओळखली जाते.

मात्र, माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या परीक्षणात काही बाबी संशय निर्माण करणाऱ्या असल्याचे समोर येत आहे. सेवा पुस्तिकेतील काही नोंदी, त्यातील तफावत, तसेच काही नोंदींची अनुपस्थिती यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशासनाकडून जतन केल्या जाणाऱ्या इतक्या महत्त्वाच्या दस्तऐवजात अशा प्रकारच्या विसंगती आढळणे ही सामान्य बाब मानता येणार नाही.

सेवा पुस्तिकेमध्ये शिपाई पदापासून ते सहाय्यक आयुक्त पदापर्यंत पोहचलेला अधिकारी  यांच्या नोंदी पण संशयास्पद आहेत, त्यामध्ये लाल शेरा, दंडात्मक कारवाई  व इतर नोंदी आहेत, ज्या संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यप्रदर्शनाशी आणि प्रशासकीय जबाबदारीशी निगडित असतात. अशा परिस्थितीत जर नोंदींमध्ये तफावत अथवा अपूर्णता आढळत असेल, तर त्यामागील कारणांचा खुलासा होणे आवश्यक ठरते.

उदय पाटील हे जळगाव महानगरपालिकेत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत राहिले आहेत. अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवा नोंदींबाबत निर्माण झालेला संभ्रम केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तर तो संपूर्ण प्रशासनाच्या विश्वासार्हतेशी जोडला जातो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे आणि नागरिकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट होणे गरजेचे आहे.

या प्रकरणातील विविध कागदपत्रांचा आणि माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या नोंदींचा तपशीलवार अभ्यास करून पुढील भागात आणखी काही महत्त्वाचे खुलासे करण्यात येणार आहेत. 3 दिवस सुट्या आल्याने अधिकाऱ्यांची थेट संपर्क झाला नाही, त्यामुळे जळगाव महानगरपालिका प्रशासन या प्रश्नांची  सोमवारी समाधानकारक उत्तरे देते का, याकडे सर्व कर्मचारी व जळगावकरांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button