सुरक्षा नगरातील पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नांवर उपमहापौर मनोज चौधरी यांची पाहणी
जळगाव (प्रतिनिधी) – सुरक्षा नगर परिसरातील नागरिकांकडून पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भात वारंवार तक्रारी येत असल्याने उपमहापौर मनोज चौधरी यांनी परिसराला भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच आरोग्य निरीक्षकांना घटनास्थळी बोलावून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांनी पाणीपुरवठा वेळेवर होत नसल्याची, पाणी कमी वेळ सोडले जात असल्याची तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार केली. याशिवाय गटार सफाई व स्वच्छतेच्या कामांमध्ये नियमितता नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत असल्याची नाराजीही व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी “प्रत्येक नागरिकाला स्वच्छ व पुरेसे पाणी मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे” असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या मूलभूत सुविधांबाबत प्रशासनाने संवेदनशील राहून तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत चौधरी यांनी स्थानिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनीही उपमहापौरांच्या या हस्तक्षेपाचे स्वागत केले.