आंतरराष्ट्रीय समपार (Level Crossing)जागरूकता दिनानिमित्त जळगाव रेल्वे गेट क्र. 148 येथे जनजागृती अभियान
जळगाव, दि. 09 जून : आंतरराष्ट्रीय समपार जागरूकता दिन( International Level Crossing Awareness Day ) निमित्त जळगाव येथील गेट क्र. 148 वर रेल्वे प्रशासनातर्फे विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. समपार फाटकांवर होणारे अपघात, जखमी होण्याच्या घटना व जीवितहानी रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश असून नागरिकांना रेल्वे सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना समपार फाटक ओलांडताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. रेल्वे फाटकाजवळ पोहोचल्यावर प्रथम थांबणे, दोन्ही बाजूंनी रेल्वे येत नसल्याची खात्री करणे, सिग्नल व इशाऱ्यांचे पालन करणे, तसेच फाटक बंद असताना कोणत्याही परिस्थितीत बूम बॅरिअरखालून जाण्याचा प्रयत्न न करणे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी समपार फाटकावरील सुरक्षेचे मूलभूत नियम सांगण्यात आले.फाटक ओलांडण्यापूर्वी थांबा आणि दोन्ही बाजूंनी पाहा.फाटक बंद असल्यास किंवा सिग्नल मिळाल्यास थांबा.बूम बॅरिअरखालून जाण्याचा प्रयत्न करू नका. रेल्वे रुळ ओलांडताना मोबाईल किंवा इअरफोन वापरू नका.रेल्वे पूर्णपणे गेल्यानंतरच पुढे जा.
अनेक अपघात हे घाईगडबड, निष्काळजीपणा आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे घडत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रेल्वे रुळ ओलांडताना मोबाईल फोनवर बोलणे, इअरफोनचा वापर करणे किंवा रेल्वेच्या वेगाचा चुकीचा अंदाज बांधणे धोकादायक ठरू शकते, याबाबत नागरिकांना जागरूक करण्यात आले.
यंदाच्या वर्षीचा आंतरराष्ट्रीय समपार जागरूकता दिनाचा संदेश “Alert Today, Safe Tomorrow” (आज सतर्क, उद्या सुरक्षित) असा असून, प्रत्येक नागरिकाने रेल्वे सुरक्षिततेचे नियम पाळल्यास अपघातमुक्त समाज घडविण्यास मदत होईल, असे रेल्वे प्रशासनाने नमूद केले.
भारतीय रेल्वे देशभरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून समपार फाटकांवरील सुरक्षिततेबाबत जनजागृती करत असून, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मानवरहित समपार फाटके बंद करणे, अंडरपास व रेल्वे उड्डाणपूल (ROB) उभारणे यांसारखी महत्त्वाची पावले उचलली आहेत. जळगाव येथील या जनजागृती अभियानालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या आंतरराष्ट्रीय अभियानाचे नेतृत्व पॅरिसस्थित इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेज (UIC) या संस्थेकडून करण्यात आले.