एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; २८.८१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व बोलेरो वाहन जप्त!
जळगाव, दि. १० : जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने प्रतिबंधित गुटखा वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत २८ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत २१ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित विमल सुगंधित गुटखा व पानमसाला तसेच ७ लाख रुपये किमतीचे बोलेरो मालवाहू वाहन जप्त करण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना ९ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली की, जळगाव शहरातून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे वाहन जाणार आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ गिरीश पाटील व पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी यांच्या पथकाने अजिंठा चौक ते इच्छादेवी चौक दरम्यान जिओ पेट्रोलपंप परिसरात सापळा रचला. संशयित बोलेरो वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल सुगंधित गुटखा व पानमसाल्याच्या ५८ गोण्या आढळून आल्या.
वाहन चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव जोगेंद्र भिका पाटील (रा. फुलपाट, ता. धरणगाव) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील वाहनातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा मिळून आला. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ५२७/२०२६ दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे व त्यांच्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.