जळगावात पाणी टंचाईवर पालकमंत्र्यांची बैठक; नागरी सुविधांवर उपमहापौर मनोज चौधरी यांनी मांडले ठोस मुद्दे!
जळगाव, दि. १७ एप्रिल २०२६ : जिल्हा नियोजन भवन येथे सकाळी १० वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाई व शहरातील नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी जळगाव शहराच्या दृष्टीने अनेक गंभीर प्रश्न मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले.
बैठकीत शहरातील नव्याने समाविष्ट झालेल्या खेडी परिसर व आव्हाणे शिवार भागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न अत्यंत तीव्र असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. या भागांमध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असून, नवीन पाणीपुरवठा लाईन टाकण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, अमृत २.० व भुयारी गटारी (मलनिस्सारण) योजनेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. वर्क ऑर्डर दिल्यानंतरही कामे संथ गतीने सुरू असल्याचे आणि काही ठिकाणी कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत बोलताना, शहरात आधी नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करावा आणि त्यानंतरच पाणी मीटर बसवण्याची प्रक्रिया राबवावी, अशी ठाम भूमिका उपमहापौरांनी मांडली.
या सर्व मुद्द्यांची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित विभागांना कामात गती आणण्याच्या सूचना देत, आवश्यक निधीबाबत सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
ही बैठक जळगाव शहरातील पाणी व नागरी सुविधांच्या प्रश्नांवर निर्णायक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.