Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रीयशैक्षणिक

अपघातप्रवण ठिकाणांवर अभियांत्रिकी सुधारणांचा आराखडा; रस्ते सुरक्षा उपाययोजनांसाठी निधीची तरतूद

जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; महामार्गांवरील सुरक्षेला प्राधान्य


जळगाव, दि.२२ (जिमाका) : ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. अपघातप्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करून आवश्यक अभियांत्रिकी सुधारणांचा आराखडा तयार करण्यात आला असून, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून त्यासाठी तरतूदही करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिली. जिल्ह्यातील रस्ते सुरक्षा उपाययोजनांची दखल घेत अपर मुख्य सचिव (परिवहन) यांनी जिल्ह्याची कामगिरी उत्तम असल्याचे नमूद केले.

‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ उपक्रमाच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी घुगे यांनी जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये आवश्यक अभियांत्रिकी सुधारणा करण्यासोबतच महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, आवश्यक उपकरणांची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण यावर भर देण्यात येत आहे. सण व उत्सवांच्या काळात काही प्रमाणात मंदावलेली अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुन्हा तीव्र करण्यात आली असून, सर्व संबंधित ठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

‘पीएम राहत’ योजनेंतर्गत संबंधितांना प्रशिक्षण देण्यात आले असून, ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या माध्यमातूनही नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. अभियांत्रिकी सुधारणा, नियमांची प्रभावी अंमलबजावणी, अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत आणि अतिक्रमण हटविणे या प्रमुख बाबींच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जात असल्याचे जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button