रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव : स्नेहल प्रतिष्ठानतर्फे गेल्या २५ वर्षांपासून गणेशोत्सव पारंपरिक आणि सामाजिक उपक्रमांसह साजरा केला जात आहे. यंदा प्रतिष्ठानचे रौप्य महोत्सवी वर्ष असून, ‘पिंप्राळ्याचा राजा’ म्हणून या गणेश मंडळाची जळगाव शहरात ओळख आहे. अजिंक्य कमलाकर देसाई हे स्थापनेपासून मंडळाचे नेतृत्व करत आहेत.
यंदा सलग दुसऱ्या वर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या केळीच्या खोडापासून ‘पिंप्राळ्याचा राजा’ची मूर्ती तयार करण्यात आली असून, ठाकूर ब्रदर्स यांनी ही मूर्ती साकारली आहे.
विसर्जनानंतर ही मूर्ती साधारण १२ ते १८ तासांत पाण्यात विरघळते. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पर्यावरणाचे नुकसान होऊ नये आणि गणेशमूर्तीचे विसर्जनही पारंपरिक पद्धतीने करता यावे, हा यामागील उद्देश असल्याचे प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांवर मिरवणूक स्नेहल प्रतिष्ठानकडून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात डीजेला फाटा देण्यात आला आहे. गणरायाचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या तालावर काढली जाते. मागील वर्षी विसर्जन मिरवणुकीत भजनांच्या तालावर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. महिलांनाही नेतृत्वाची संधी दिली जात असल्याने मिरवणुकीत महिलांचा मोठा सहभाग असतो.
गणेशोत्सवाच्या काळात गेल्या २५ वर्षांपासून समाजप्रबोधनासाठी कीर्तन सप्ताहाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत वारकरी संप्रदायातील ७७ कीर्तनकारांनी या उपक्रमात कीर्तन केले आहे. कीर्तन महोत्सवादरम्यान विविध वारकरी शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी मदतही केली जाते.प्रतिष्ठानकडून गेल्या २५ वर्षांपासून नेत्रतपासणी शिबिरे, चष्मे वाटप आणि रक्तदान शिबिरेही घेतली जात आहेत. हिवाळ्यात गरजू नागरिकांना ब्लँकेट, तर दिवाळीत फराळ आणि मिठाईचे वाटप केले जाते.
याशिवाय जळगाव शहरातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही स्नेहल प्रतिष्ठानचा सहभाग असतो. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाही भक्ती, परंपरा, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.