जळगावात “दामिनी पथक” पुन्हा सुरू; महिलांच्या सुरक्षेला नवे बळ
नागरिकांकडून या उपक्रमासाठी पोलीस अधीक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र पोलिसांचे महिलांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले “दामिनी पथक” जळगाव शहरात पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे पथक बंद असल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने निर्णय घेत आजपासून पथक पुन्हा कार्यरत केले.
जिल्हा पोलिस अधिक्षकांनी नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या महिला अमलदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर सूचना दिल्या. पथकाच्या कार्यक्षमतेसाठी एक चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दामिनी पथकाचे मुख्य उद्दिष्ट महिलां व विद्यार्थिनींची सुरक्षा सुनिश्चित करणे असून छेडछाड, अत्याचार, घरगुती हिंसा यांसारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे हे आहे. तसेच महिलांना तक्रार नोंदविण्यास प्रोत्साहित करणे आणि समाजात विश्वासाचे वातावरण निर्माण करणे यावर भर दिला जाणार आहे.
पथकाकडून शहरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा व इतर सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना “गुड टच-बॅड टच” तसेच सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले जाईल.
याशिवाय, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, महिला हेल्पलाईन (१०९१) वर आलेल्या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद देणे आणि शक्यतो १० मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.पीडित महिलांना कायदेशीर, वैद्यकीय आणि मानसिक आधार देण्याबरोबरच समुपदेशनाद्वारे त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. विविध जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्कांविषयी माहिती देण्याचे काम पथक करणार आहे.
दामिनी पथकाच्या पुनरुज्जीवनामुळे महिलांमध्ये पोलिसांबाबत विश्वास वाढण्यास मदत होईल, तसेच शहरातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.दामिनी पथकाच्या पुनरारंभामुळे जळगाव शहर अधिक सुरक्षित आणि जागरूक दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.