बनावट फोटोद्वारे तरुणीची बदनामी; आरोपीवर कठोर कारवाईची छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी
महिला आयोग, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन; सोशल मीडियावरील बदनामी रोखण्यासाठी कडक कायद्याचीही मागणी
प्रतिनिधी जळगाव : सोशल मीडियावर एका तरुणीचा वरिष्ठ मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा बनावट फोटो प्रसारित करून तिची बदनामी केल्याप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, बीड जिल्ह्यातील गोदी खुर्द येथील भरत बालाजी म्हस्के या संशयित आरोपीला जळगाव पोलिसांनी अटक केल्याचे नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपीने एका निष्पाप तरुणीचा बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे तिची बदनामी झाली असून, तिच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असे ब्रिगेडने म्हटले आहे.
या प्रकरणात आरोपीवर मोक्का (MCOCA) सारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर महिलांची बदनामी करणारे बनावट फोटो किंवा कृत्रिमरीत्या तयार केलेले (डीपफेक) फोटो प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कायदे करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि महाराष्ट्र शासनाने अवयवदानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडलेल्या एका मराठी तरुणीची बदनामी झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला असून, या प्रकरणाची महिला खासदारांनीही गंभीर दखल घेऊन संसदेत आवाज उठवावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी ब्रिगेडने केले आहे.