आरटीओच्या ट्रॅकवर नियमांना ठेंगा; मोबाईलवर बोलत बुलेटस्वाराची सुसाट सवारी! पत्रकारांच्या कॅमेऱ्यात प्रकार कैद होताच कारवाई!
“आरटीओचा धाक संपला; नियमांची ऐसीतैशी, ‘वसुली’त अधिकारी व्यस्त की मस्त!”
जळगाव : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात वाहनांची तपासणी आणि टेस्ट सुरू असताना मंगळवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार समोर आला. चारचाकी वाहनाची टेस्ट सुरू असलेल्या ट्रॅकवर एक बुलेटस्वार थेट वाहन चालवत होता. विशेष म्हणजे, वाहन चालवतानाच संबंधित व्यक्ती मोबाईलवर बोलत असल्याचेही दिसून आले. हा प्रकार तब्बल तीन आरटीओ निरीक्षकांच्या उपस्थितीत घडल्याने कार्यालयातील नियमपालनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरटीओच्या वाहन टेस्ट ट्रॅकवर वाहन तपासणीसाठी ठराविक नियम असताना ट्रॅकच्या आजूबाजूला एजंटांसह नागरिकांची वाहने सर्रास पार्क केलेली दिसतात. त्यामुळे वाहनांच्या टेस्टसाठी असलेला परिसर वाहनतळासारखा वापरला जात असल्याचे चित्र आहे. परिस्थिती इतकी पुढे गेली आहे की, वाहने आरटीओच्या थेट पायरीपर्यंत पोहोचल्याचेही दिसून येत आहे. फक्त अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये वाहन गेले नाही, म्हणून ते बाहेरच पार्क केले असावे, अशी उपरोधिक चर्चा परिसरात रंगली आहे. विशेष म्हणजे, पत्रकारांनी बुलेटस्वाराच्या या प्रकाराचे चित्रण सुरू केल्यानंतरच आरटीओ प्रशासनाला जाग आली आणि संबंधित व्यक्तीवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे ‘कॅमेऱ्याची नजर पडल्यावरच नियमांची आठवण होते का?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
या कारवाईतील दंडाची रक्कम किती, असा प्रश्न आरटीओ निरीक्षक फाफडे यांना विचारण्यात आला असता, त्यांनी “कार्यालयात अर्ज करून माहिती घ्या,” असे उत्तर देत माहिती देण्याचे टाळले. नागरिकांच्या करातून शासनाचा महसूल जमा होतो आणि त्यातूनच शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाते. मग सार्वजनिक ठिकाणी झालेल्या कारवाईची प्राथमिक माहिती देण्यास एवढी टाळाटाळ का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे
.मात्र संबंधित बुलेटस्वारावर नेमकी कोणत्या स्वरूपाची आणि कोणत्या नियमभंगाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उपलब्ध चित्रणात बुलेटची नंबर प्लेट तुटलेली असल्याचे दिसून येते. नंबर प्लेट एचएसआरपी पण नव्हती , आणि वाहनचालकाकडे हेल्मेट नसल्याचेही दिसले. याशिवाय आणखी कोणता नियमभंग आढळला होता का, याबाबतही स्पष्टता नाही. मग आरटीओने नेमका कोणता दंड ठोठावला? दंडाची रक्कम किती होती? कोणत्या कलमानुसार कारवाई करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत. पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर कारवाई झाल्याचे सांगितले जाते; मात्र कारवाईचा नेमका स्वरूप आणि तपशील सांगण्यास प्रशासनाकडून ‘अर्ज करून माहिती घ्या’ असे उत्तर मिळत असल्याने या कारवाईबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नियम तोडणाऱ्या नागरिकावर दंड, पण नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून माहिती मागितली तर ‘अर्ज करा’—हा कोणता कारभार? असा सवाल तेथील बघणाऱ्या नागरिकांकडून केला जात आहे.
आरटीओ कार्यालयात वाहन तपासणीच्या ट्रॅकची शिस्त, पार्किंग व्यवस्था आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नियमभंगाकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का? की पत्रकारांचा कॅमेरा दिसेपर्यंतच कारवाई आणि त्यानंतर पुन्हा ‘जैसे थे’ कारभार, अशीच परिस्थिती कायम राहणार? याकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले आहे.