महापौरांच्या संकल्पनेखाली महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम.मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत तब्बल १ लाख वृक्षारोपणाचा धडाका !
प्रतिनिधी जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण व भव्य पाऊल उचलले आहे. ‘मिशन ग्रीन जळगाव सिटी’ या विशेष मोहिमेअंतर्गत शहरात तब्बल १ लाख वृक्षारोपण करण्याचे भव्य नियोजन करण्यात आले आहे. सोमवारी दि. १० रोजी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील, खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात होणार आहे.
जळगाव शहराला हिरवाईची शाल पांघरण्यासाठी व जळगावला प्रदूषणमुक्त आणि नयनरम्य बनवण्यासाठी ही मोहीम एक लोकचळवळ ठरणार आहे.
रस्त्यांचे सुशोभीकरण : शहरातील मुख्य रस्ते, गल्लीबोळ आणि महामार्गाच्या दोन्ही दुतर्फा (डिव्हायडर व बाजूला) मोठ्या प्रमाणावर सावली देणाऱ्या झाडांची लागवड केली जाईल.
ओपन स्पेसचा वापर : महापालिकेच्या मालकीच्या सर्व मोकळ्या जागा आणि सार्वजनिक भूखंडांवर हिरवाई फुलवली जाणार आहे.
हेमू कलानी उद्यानात ‘मियावाकी जंगल’ : जळगाव शहरातील प्रसिद्ध हेमू कलानी उद्यानात जपानी तंत्रज्ञानावर आधारित मियावाकी पद्धती’ने अवघ्या काही काळात घनदाट जंगल उभारले जाईल. येथे तब्बल १५,००० रोपांची विशेष लागवड केली जाणार आहे.
केवळ लागवड नाही, तर संगोपनाचीही पूर्ण जबाबदारी!
झाडे लावून ती जगवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने झाडांच्या नियमित पाण्यासह, ट्री-गार्ड (संरक्षक जाळ्या) आणि देखभालीची सक्षम यंत्रणा उभारली आहे. स्थानिक नागरिकांनीही आपापल्या भागातील झाडांचे पालकत्व घ्यावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे, आयुक्त आदित्य जीवने यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हरित महाराष्ट्र मिशन अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका, सामाजिक संस्था व नागरिकांच्या सहयोगाने साकारलेल्या या हरित मोहिमेत केवळ प्रशासनच नाही, तर शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. सोमवारी दि. १० रोजी मान्यवरांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात होणार आहे.
“जळगावचे तापमान आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता, शहराला ‘ग्रीन कॉरिडॉर’ बनवणे ही काळाची गरज आहे. या १ लाख वृक्षारोपणाच्या मोहिमेत प्रत्येक जळगावकराने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा.चला, आपण सर्वजण मिळून या ‘मिशन ग्रीन जळगाव’मध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जळगावला अधिक सुंदर, हिरवेगार नि समृद्ध बनवूया!”