जळगाव मनपाच्या जन्म-मृत्यू विभागात पुन्हा गंभीर गोंधळ; जन्म दाखला जळगावचा, मात्र दाखवल्यावरील क्यू आर कोड स्कॅन केल्यावर दुसऱ्याच राज्यातील महिलेची माहिती समोर ! QR कोडमुळे उघड झाला प्रकार
प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अधिकृत दाखल्यांमधील माहितीच्या अचूकतेबाबत गंभीर शंका उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नागरिकाला मनपातील जन्म मृत्यू विभागाकडून देण्यात आलेल्या जन्म दाखल्यावरील नाव बरोबर असताना,त्यावरील QR कोड स्कॅन केल्यानंतर मात्र पूर्णपणे वेगळ्या व्यक्तीचा दाखला उघडत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील एका नागरिकाने 2020 मध्ये महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागातून जन्म दाखला प्राप्त केला होता .या दाखल्यावर “वेदांत कदम” असे नाव स्पष्टपणे नमूद आहे. मात्र, या दाखल्यावरील QR कोड मोबाईलद्वारे स्कॅन केल्यानंतर संबंधित वेदांत कदम यांचा दाखला न उघडता “राधिका” नावाच्या महिलेचा दाखला समोर येतो. प्राथमिक माहितीनुसार ही महिला लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील असल्याचे दिसून येत आले आहे. मुलाच्या शाळेत आधार कार्ड संबंधित काम निघाल्यामुळे हा प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर शासनाच्या च्या जन्म-मृत्यू विभागातील डिजिटल प्रणाली, डेटा व्यवस्थापन आणि पडताळणी प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शासकीय दाखल्यांवरील QR कोडचा उद्देश म्हणजे संबंधित दस्तऐवजाची सत्यता पडताळणे आणि बनावट कागदपत्रांना आळा घालणे. मात्र, अधिकृत दाखल्यावरील QR कोडच दुसऱ्या व्यक्तीचा दाखला दाखवत असेल, तर नागरिकांनी कोणत्या माहितीवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकरणात अनेक शक्यता समोर येत आहेत.
– दाखला तयार करताना चुकीचा QR कोड जोडला गेला का?
– डेटा अपलोड करताना तांत्रिक त्रुटी झाली का?– सॉफ्टवेअरमध्ये गंभीर बिघाड आहे का?
– अथवा संबंधित कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाला का?
या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. हा प्रकार केवळ एका दाखल्यापुरता मर्यादित आहे की, अशाच प्रकारच्या चुका इतर अनेक दाखल्यांमध्येही आहेत, याची तपासणी करणे गरजेचे आहे. कारण जन्म व मृत्यू दाखले हे पासपोर्ट, आधार, शैक्षणिक प्रवेश, वारसा, विमा आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. अशा चुका नागरिकांसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकतात. या गंभीर प्रकाराची राज्य शासन किंवा मनपा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संपूर्ण डिजिटल प्रणालीचे ऑडिट करणे, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत यासाठी आवश्यक उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
एका अधिकृत दाखल्यावरील QR कोड दुसऱ्या राज्यातील महिलेचा दाखला दाखवत असेल, तर हा केवळ तांत्रिक दोष नसून नागरिकांच्या विश्वासाला तडा देणारा प्रकार आहे. आता या प्रकरणात नेमकी चूक कोणाची आणि जबाबदार कोण, याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागणार आहे.
