ताज्या बातम्या

सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांच्या तक्रारीची दखल; प्रभात कॅफेला FOSCOS तपासणीत ४३ गुण, अन्न सुरक्षा विभागाची सुधारणा नोटीस


प्रतिनिधी : जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील प्रभात कॅफे संदर्भात भेसळयुक्त अन्नपदार्थ, स्वच्छता, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, परवाना तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी अन्न सुरक्षा विभागाकडे सविस्तर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत विभागाने ऑनलाइन तपासणी केली असून संबंधित आस्थापनाला सुधारणा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती तक्रारदाराला देण्यात आली आहे.

अनिल नाटेकर यांनी केलेल्या तक्रारीत प्रभात कॅफेकडे वैध अन्न व्यवसाय परवाना आहे का, अन्नपदार्थांची शेवटची तपासणी कधी झाली, अन्न निरीक्षकांचा अहवाल, कर्मचाऱ्यांची मेडिकल फिटनेस चाचणी, अन्न नमुन्यांची तपासणी, नोंदणी परवाना व वार्षिक शुल्क, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, वॉटर टँक तपासणी, वेटरना हँडग्लोव्हज व कॅपसारखी संरक्षण साधने उपलब्ध आहेत का तसेच ग्राहकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली आहे का, अशा सात महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती व प्रत्यक्ष तपासणीची मागणी करण्यात आली होती.

तक्रारीच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा विभागाने दिलेल्या उत्तरानुसार, २४ जून २०२६ रोजी FOSCOS प्रणालीवर ऑनलाइन तपासणी करण्यात आली. या तपासणीत संबंधित आस्थापनाला केवळ ४३ गुण मिळाले. त्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच नियम व विनियम २०११ अंतर्गत संबंधित आस्थापनाला सुधारणा नोटीस बजावण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी तक्रारीत उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर स्वतंत्र तपासणी अहवाल, अन्न नमुन्यांची चाचणी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, स्वच्छतेची सद्यस्थिती, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि इतर कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचे दिसून येते.

यामुळे सुधारणा नोटीस बजावल्यानंतर प्रभात कॅफेने आवश्यक त्रुटी दूर केल्या आहेत का, तसेच अन्न सुरक्षा विभाग पुढील प्रत्यक्ष तपासणी करून कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button