वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील
चार हजारांहून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; जी.एस. ग्राऊंड ते रेल्वे स्थानक भक्ती, शिस्त आणि समर्पणाचा अद्वितीय सोहळा
जळगाव, दि. २७ : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून हा भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला.
जी.एस. ग्राऊंडवरून निघालेल्या भव्य पालखी-दिंडीत टाळ, मृदंग, अभंग आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः दिंडीत सहभागी होत वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत अभंग गायले. रेल्वे स्थानकावर त्यांनी प्रत्येक डब्यात जाऊन वारकऱ्यांच्या सुविधांची पाहणी करून संवाद साधला.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, “वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही. वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई असून हजारो वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे.”
या उपक्रमाचे नियोजन प्रतापराव पाटील व GPS मित्रपरिवार यांनी केले. विशेष रेल्वेत डॉक्टर, स्वयंसेवक, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. पंढरपूर येथे निवास, महाप्रसाद, चंद्रभागा स्नान व विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमाला गजानन महाराज वरसाडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर ललित कोल्हे, उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर व हजारो वारकरी उपस्थित होते.