Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

2022 मधील पोक्सो प्रकरणात आरोपीला 20 वर्षांची सक्तमजुरी; चार वर्षीय बालिकेवरील अत्याचारप्रकरणी न्यायालयाचा निकाल !


प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद पोलीस ठाण्यात २०२२ मध्ये दाखल झालेल्या चार वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार (POCSO) प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे.

मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-३ श्रीमती पी. पी. बांकर यांनी दिलेल्या निकालात आरोपी परमानंद कन्हैयालाल गोरे (वय २८) याला POCSO कायद्याच्या कलम ६ अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व ₹२०,००० दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास आरोपीला दोन महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

२०२२ मध्ये  नशिराबाद जवळ एका गावातील चार वर्षीय बालिकेवर तिच्याच नातेवाईकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०/२०२२ दाखल करण्यात आला होता. तपास पूर्ण करून पोलिसांनी ९ फेब्रुवारी २०२२ रोजी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यानंतर २४ जून २०२२ रोजी आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आणि सुनावणीनंतर न्यायालयाने दोषसिद्धी करत शिक्षा सुनावली.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने अनेक महत्त्वाच्या बाबींचा विचार केला. पीडित बालिकेने तपासादरम्यान तसेच न्यायालयात आरोपीची सातत्यपूर्ण ओळख पटविली. न्यायवैद्यक (Forensic) अहवालातील पुराव्यांमुळे आरोपीचा घटनास्थळाशी संबंध स्पष्ट झाला. तसेच वैद्यकीय अहवालात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि तिच्या खासगी अवयवांवरील दुखापतींची स्पष्ट नोंद असल्याने आरोपीविरुद्धचे पुरावे भक्कम ठरले.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भास्कर साळुंखे यांनी केला. न्यायालयात सरकार पक्षाची प्रभावी बाजू सरकारी वकील ऍड. एस. जी. काबरा यांनी मांडली, तर पैरवी अंमलदार अमोल पाटील यांनी खटल्याच्या पाठपुराव्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या तिघांच्या समन्वयामुळे गुन्हा न्यायालयात सिद्ध होण्यास मदत झाली.

नशिराबाद पोलिसांनी केलेला सखोल तपास, वैज्ञानिक पुरावे आणि प्रभावी न्यायालयीन मांडणी यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावत बाल लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांबाबत शून्य सहनशीलतेचा स्पष्ट संदेश दिला आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button