जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील धक्कादायक घटना; दोन जणांच्या वादात ६ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
प्रतिनिधी : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाणे शिवारात शुक्रवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. दोन व्यक्तींमधील पैशाच्या वादात झालेल्या मारहाणीदरम्यान दांडक्याचा फटका एका ६ वर्षीय चिमुकल्याला लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वंश सुनील बारेला (वय ६, रा. उनपदेव, अडावद, ता. चोपडा) हा आपल्या कुटुंबासह आव्हाणे शिवारातील म्हशींच्या गोठ्यावर राहत होता. हे बारेला कुटुंब गेल्या दीड वर्षांपासून गोठा व शेताच्या देखभालीचे काम करत असल्याचे सांगितले जाते.
घटनास्थळाजवळच मच्छिंद्र रमण पाटील (वय ३२, रा. आव्हाणे) याची पानटपरी आहे. गोठ्यावर काम करणाऱ्या भावेश धनगर याच्याकडे आरोपीचे ९०० रुपये येणे होते. या पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
प्राथमिक माहितीनुसार, संतापाच्या भरात आरोपीने हातातील लाकडी दांडक्याने भावेश धनगर याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र भावेशने तो वार चुकवला. त्यावेळी जवळच उभा राहून भांडण पाहत असलेल्या वंश बारेला याच्या डोक्यावर दांडका लागला. गंभीर दुखापत झाल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी मच्छिंद्र रमण पाटील याला लाकडी दांडक्यासह ताब्यात घेत अटक केली.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे एका क्षुल्लक आर्थिक वादातून निष्पाप चिमुकल्याचा जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.कायद्याच्या भाषेत
“Culpable Homicide” याला मराठीत “सदोष मनुष्यवध” असे म्हणतात. याचा अर्थ प्रत्येक मृत्यू हा “खून” (Murder) असतोच असे नाही.
(जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कृतीमुळे दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो, परंतु त्या व्यक्तीला त्या विशिष्ट व्यक्तीचा जीव घेण्याचा स्पष्ट हेतू (intention to kill) नसतो, तरीही त्याच्या हिंसक किंवा धोकादायक कृत्यामुळे मृत्यू होतो, अशा गुन्ह्याला सदोष मनुष्यवध म्हटले जाते.)