‘ग्रीन सिटी’च्या दिशेने जळगाव मनपाची मोठी झेप; पुढील ५ वर्षांत तापमान कमी करण्यासाठी कृती आराखडा
महापौर दीपमाला काळे व आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक; शहरभर आणि शाळा-महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा निर्णय
जळगाव प्रतिनिधी : शहरातील वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. यासाठी मनपा आणि ग्रीन सिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महापौर दीपमाला काळे व आयुक्त आदित्य जीवने यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत २०२६ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत जळगावचे तापमान कमी करण्यासाठी व्यापक कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली.या उपक्रमांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मात्र, केवळ वृक्ष लागवड न करता त्यांचे संवर्धन आणि संगोपन यावरही विशेष भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “वृक्षारोपण केवळ औपचारिकता न राहता त्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन झाले पाहिजे. पुढील चार महिन्यांत शहरात नियोजनबद्ध पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येईल. या उपक्रमामुळे भविष्यात जळगावचे तापमान कमी होण्यास निश्चितच मदत होईल.”
बैठकीस उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त संजय राऊत, पर्यावरण विभागाचे प्रकाश पाटील तसेच ग्रीन सिटी फाउंडेशनचे विजयकुमार वाणी, डॉ. धनंजय बेंद्रे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शहर अधिक हिरवेगार, पर्यावरणपूरक आणि उष्णतेपासून दिलासा देणारे बनवण्यासाठी नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले.