ताज्या बातम्या

मुविकोराज कोल्हे यांची जळगावात स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठाची मागणी

खासदार स्मिताताई वाघ यांना मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांचे निवेदन; कृषी शिक्षण, संशोधन व रोजगाराला चालना मिळणार असल्याचा दावा


जळगाव, दि. २५ : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या चार जिल्ह्यांच्या कृषी विकासाला नवी दिशा देण्यासाठी जळगाव येथे स्वतंत्र ‘उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ’ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मुविकोराज मुरलीधर कोल्हे यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात उत्तर महाराष्ट्र हा राज्यातील महत्त्वाचा कृषी पट्टा असून केळी, कापूस, मका, ज्वारी, बाजरी, ऊस, द्राक्षे, डाळिंब, कांदा, भाजीपाला तसेच कृषी प्रक्रिया उद्योगात या विभागाने मोठी प्रगती केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः जळगाव जिल्हा देशातील “केळीची राजधानी” म्हणून ओळखला जात असून येथील केळीची परदेशातही निर्यात केली जाते. एवढे मोठे कृषी योगदान असूनही या विभागात स्वतंत्र कृषी विद्यापीठ नसल्याची खंत निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

कोल्हे यांनी सांगितले की, स्वतंत्र कृषी विद्यापीठ उभारल्यास उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर दर्जेदार कृषी शिक्षण, संशोधन, आधुनिक प्रयोगशाळा आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्थानिक शेतीच्या समस्यांवर संशोधनाला चालना मिळेल.

प्रस्तावित विद्यापीठात नैसर्गिक व सेंद्रिय शेती, प्रिसिजन फार्मिंग, कृषी ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मृदा व पाणी परीक्षण, हवामान आधारित पीक नियोजन, कीड व्यवस्थापन, डिजिटल कृषी सेवा आणि बाजारपेठ मार्गदर्शन यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, कापूस संशोधन केंद्र, कृषी ड्रोन व स्मार्ट फार्मिंग संशोधन केंद्र, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी संशोधन केंद्र, हवामान बदल व जल व्यवस्थापन संशोधन केंद्र तसेच अन्न प्रक्रिया व मूल्यवर्धन संशोधन केंद्र जळगाव येथे सुरू करण्याचाही प्रस्ताव निवेदनात मांडण्यात आला आहे.

विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि हवामान विज्ञान अशी विविध संकुले सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यापीठ परिसरात जागतिक दर्जाची ‘उत्तर महाराष्ट्र कृषी ज्ञाननगरी’ (Agri Knowledge City) उभारून कृषी विज्ञान पार्क, स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर, कृषी पर्यटन केंद्र, डिजिटल संशोधन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे सुमारे पाच हजार थेट आणि वीस हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, तसेच कृषी प्रक्रिया उद्योग, संशोधन, निर्यात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव येथे स्वतंत्र उत्तर महाराष्ट्र कृषी विद्यापीठ स्थापन करणे, किमान एक हजार एकर जागा उपलब्ध करून देणे, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र सुरू करणे, ICAR मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणे आणि उच्चस्तरीय शासन समिती स्थापन करणे आदी प्रमुख मागण्याही कोल्हे यांनी निवेदनातून केल्या आहेत.

मुविकोराज कोल्हे यांनी म्हटले आहे की, जळगाव येथे स्वतंत्र कृषी विद्यापीठाची स्थापना हा केवळ शैक्षणिक प्रकल्प नसून उत्तर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि कृषी उद्योजकांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा विकासाचा टप्पा ठरेल. हा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मंजूर करावा, अशी विनंती त्यांनी खासदार स्मिताताई वाघ यांच्यामार्फत केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button