जळगाव पोलीस मुख्यालयात मोठी कारवाई: दोन पोलीस अंमलदार निलंबित!
ड्युटीवरून गैरहजर राहून SLR रायफल्स बेवारस ठेवण्याचा गंभीर प्रकार उघड, दोन पोलीस अंमलदार निलंबित,
प्रतिनिधी जळगाव 9 मे : पोलीस मुख्यालय जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा व शिस्तभंग केल्याप्रकरणी तातडीने निलंबित करण्यात आले आहे. दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९:२० वाजता राखीव पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीची अचानक तपासणी केली असता, गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील व पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित आढळून आले. यावेळी अधिक तपासणी केली असता गार्ड रूममध्ये ठेवलेल्या ३ एस.एल.आर. रायफल्सपैकी बट नं. ८२.२६२.८८२ ही रायफल कोणत्याही दारूगोळ्याशिवाय तसेच आवश्यक सुरक्षितता न ठेवता बेवारस स्थितीत आढळून आली, ही बाब अत्यंत गंभीर मानण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी ड्युटीवरून गैरहजर राहणे तसेच शस्त्रास्त्रांच्या सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे स्पष्ट उल्लंघन असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी संबंधित दोन्ही अंमलदारांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी केले असून निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय जळगाव येथेच राहील तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे, या कारवाईमुळे पोलीस दलात शिस्त व जबाबदारीबाबत स्पष्ट संदेश गेला आहे.