Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

1 मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री बंद करा; अन्यथा २५ हजार दंड व गुन्हे दाखल होणार — मनपा प्रशासनाचा कडक इशारा ! प्लास्टिकमुक्त जळगावसाठी महापौर दीपमाला काळे व उपमहापौर मनोज चौधरी यांची व्यापाऱ्यांसोबत निर्णायक बैठक

प्लास्टिक विक्रेत्यांनो सावधान — मुदत संपली की मनपा करणार कडक कारवाई


जळगाव : शहराला प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने जळगाव महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापौर दीपमाला काळे यांनी प्लास्टिक विक्रेत्यांची तातडीची बैठक घेऊन १ मार्चपर्यंत शहरात प्लास्टिकची विक्री पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. निर्धारित मुदतीनंतर प्लास्टिक साठा किंवा विक्री आढळल्यास संबंधितांवर २५ हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असून, आवश्यकतेनुसार गुन्हेही दाखल करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

सोमवार, १६ फेब्रुवारी रोजी महापौर दालनात पार पडलेल्या या बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, वरिष्ठ आरोग्य अधीक्षक रमेश कांबळे, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष कमल शामनानी, धनराज चावला, डॉ. लीना पाटील तसेच ‘माझे शहर माझी जबाबदारी’ उपक्रमातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्लास्टिकमुळे पर्यावरणासह मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकला. कॅन्सर, दमा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक आढळण्याच्या घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांना प्लास्टिकचा साठा हटविण्यासाठी १ मार्चपर्यंतची अंतिम मुदत देण्यात येत आहे. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. प्लास्टिकऐवजी कंपोस्टेबल बॅग्स, कापडी पिशव्या व पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. महिला बचत गटांकडून कापडी पिशव्या खरेदी केल्यास पर्यावरण संवर्धनासोबतच स्थानिक महिलांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.

बैठकीत डॉ. लीना पाटील यांनी पर्यावरणपूरक पिशव्या व पर्यायी साहित्याच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच शहरात कुठेही प्लास्टिक विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी थेट महापौर किंवा उपमहापौरांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.

व्यापाऱ्यांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत, त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी संवाद साधणारे हे पहिलेच महापौर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रशासनाच्या कारवाईचा पहिला टप्पा सिंगल युज प्लास्टिक, विशेषतः कॅरिबॅग बंद करण्यावर केंद्रित असणार असून, १५ मार्चनंतर या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “जळगावच्या नागरिकांच्या हितासाठी आणि भविष्यातील पर्यावरणीय संकट टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. प्लास्टिक वापरण्याची सवय बदलणे ही काळाची गरज आहे. ही पहिली सूचना सामंजस्याने देत आहोत; मात्र त्यानंतर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.”


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button