महावितरणच्या बदललेल्या मीटर रिडिंग तारखेमुळे ग्राहक त्रस्त; मनसेची तातडीची दखल, दिला ठोस इशारा
प्रतिनिधी जळगाव : महावितरण विभागाकडून मागील दोन महिन्यांपासून मीटर रिडिंगच्या तारखेत कोणतीही पूर्वसूचना न देता केलेल्या अचानक बदलामुळे जळगाव शहरातील हजारो ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी दर महिन्याच्या २५ तारखेला घेतले जाणारे रिडिंग आता २२ तारखेलाच घेतले जात असून या बदलाचा थेट परिणाम नागरिकांच्या वीजबिलांवर होत आहे. विशेषतः स्वतः ऑनलाईन रिडिंग सबमिट करणाऱ्या ग्राहकांना तर प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात निवेदन देण्यात आले. रिडिंग तारखेतील बदलामुळे वाढलेले बिल, चुकीच्या रिडिंगमुळे लावले जाणारे दंड व विलंब शुल्क, तसेच तक्रार निवारणात होत असलेला विलंब याबाबत मनसेने निवेदनात गंभीर चिंता व्यक्त केली.
मनसेच्या निवेदनानंतर महावितरणने तक्रार निवारण अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन दिले असले तरी मनसेने पुढील महत्त्वाचे मुद्दे तातडीने अंमलात आणण्याची मागणी केली आहे—
ग्राहकांना एसएमएस, संकेतस्थळ व मराठीतून स्पष्ट सूचना देणे चुकीच्या बिलांवरील सर्व दंड आणि अतिरिक्त शुल्काची तात्काळ माफी रिडिंगच्या तारखेत बदल करण्यापूर्वी किमान १५ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक करणे
मनसेने स्पष्ट इशारा दिला आहे की, ग्राहकहिताचा हा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित केल्यास संघटनेला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
या वेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, विकास पाथरे, ॲड. सागर शिंपी, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.