ताज्या बातम्या

तोंडापूर परिसरात विषारी रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट; पर्यावरण प्रदूषणप्रकरणी गुन्हा दाखल


जामनेर : तोंडापूर परिसरात विषारी रसायनांची बेकायदेशीर विल्हेवाट लावून जमीन, पाणी आणि पर्यावरण प्रदूषित केल्याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी प्रशांत साहेबराव सांडू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोंडापूर येथील शेख हसन शेख सांडू यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक 161/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपीने वाकोद शिवारातील गट क्रमांक 253/2 तसेच ढालसिंगी शिवारातील गट क्रमांक 118/2 मधील शेतजमिनीमध्ये विषारी रसायने व केमिकलयुक्त पदार्थ प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून टाकल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून त्यामुळे रसायने जमिनीत झिरपून भूजल व परिसरातील जलस्रोत दूषित झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वातावरण आणि मानवी आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 271, 272, 279, 280 आणि 286 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्यावरण व सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर बाब असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते हे करीत असून, संबंधित ठिकाणांहून नमुने संकलित करून रसायनांचे स्वरूप व प्रदूषणाची तीव्रता तपासली जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शेतजमिनी व जलस्रोतांमध्ये विषारी रसायनांची विल्हेवाट लावल्याच्या घटना पर्यावरण संरक्षण यंत्रणांसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. या प्रकरणाच्या तपासातून रसायनांचा स्रोत, त्यांची मात्रा आणि पर्यावरणावर झालेला परिणाम स्पष्ट होणार आहे. जर आरोप सिद्ध झाले, तर संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button