पाणीगळती रोखा, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा : महापौर दीपमाला काळे
पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना; सर्व प्रभागांत सर्वेक्षण करण्याचे आदेश
जळगाव : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासह पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी शहरातील विविध भागांतील पाणीगळती तातडीने थांबविण्याचे आणि निष्काळजीपणे पाणी वाया घालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला पाणीपुरवठा विभागप्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरात नळांना तसेच पाइपलाइनला होणारी पाणीगळती तातडीने दुरुस्त करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. तसेच शहरातील वॉटर मीटर बसविण्याची सध्याची कार्यपद्धती आणि त्यासंबंधीची सविस्तर माहिती लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
पाण्याची नासाडी टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या नळांना तोट्या बसवाव्यात, असे आवाहन करण्यात आले. यासाठी शहरातील सर्व प्रभागांमध्ये सर्वेक्षण करून कोणत्या नागरिकांनी नळांना तोट्या बसवल्या आहेत आणि कोणाकडे त्या नाहीत, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश महापौरांनी दिले.
पाणी हे अत्यंत मौल्यवान असून त्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीगळती रोखणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करणे याला महापालिकेकडून प्राधान्य दिले जाणार आहे. नागरिकांनीही नळांना तोट्या बसवून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर दीपमाला काळे यांनी केले.