जळगावमध्ये आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; किशोरवयीन मुली व महिलांना कर्करोग प्रतिबंध आणि HPV लसीकरणाबाबत मार्गदर्शन
प्रतिनिधी जळगाव : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत तसेच जागतिक औषधनिर्माता दिनानिमित्त जळगाव शहर महानगरपालिका, दवाखाने विभागाच्या वतीने शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे २४ सप्टेंबर २०२६ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जळगाव ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी सोसायटीच्या वतीने किशोरवयीन मुली व महिलांसाठी विशेष आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
या आरोग्य शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकतेनुसार आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि विविध आजारांपासून बचावाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा), महापौर दिपमालाताई काळे, उपमहापौर मनोजभाऊ चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील उपस्थित होते. तसेच शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्रा. पी. पी. चौधरी, मुख्य कार्यक्रम समन्वयक विवेक काहाळे, विभागप्रमुख सी. आर. पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता महाजन व डॉ. सोनल इंगळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ यांच्यासह महानगरपालिकेच्या दवाखाने विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुजाता महाजन व डॉ. सोनल इंगळे यांनी मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता व आरोग्यविषयक काळजी, महिलांमध्ये आढळणारा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून प्रतिबंधासाठी उपलब्ध HPV लसीकरणाबाबत किशोरवयीन मुली व महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली.
सदर आरोग्य शिबिराचे आयोजन आयुक्त आदित्य जिवने (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाने विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी नियमित आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि आरोग्यविषयक जनजागृतीचे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
या शिबिरादरम्यान महिलांचे आरोग्य, कर्करोगाचे लवकर निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निरोगी जीवनशैली याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.