चौक सुशोभीकरणातील नियमभंग महागात; भंगाळे ज्वेलर्स, हॉटेल रॉयल पॅलेस, आर.सी. बाफनासह ११ व्यावसायिकांना मनपाच्या नोटिसा
NOC मिळाल्याशिवाय जाहिरात करण्यास मनाई; आयुक्तांचे स्पष्ट निर्देश! २ दिवसांत फलक न हटवल्यास अतिक्रमण विभागाकडून होणार कारवाई
प्रतिनिधी: जळगाव शहर महानगरपालिकेने शहरातील चौक व दुभाजकांच्या सुशोभीकरणाच्या कामात नियमांचे पालन करण्याबाबत कडक भूमिका घेतली असून नियमभंग करणाऱ्या ११ संस्था व कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आयुक्तांच्या २४ जुलै २०२६ रोजीच्या निर्देशानुसार या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
मनपाने हॉटेल रॉयल पॅलेस, आर. एल. ज्वेलर्स, भंगाळे गोल्ड, आदित्य फार्म, सुप्रीम इंडस्ट्रीज, अदानी सिमेंट, डायनामिक्स मल्टी प्रो, जैन इरिगेशन, सरस्वती फोर्ड, आर. सी. बाफना आणि जी. एम. फाउंडेशन यांना नोटिसा बजावत नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महानगरपालिकेच्या नोटिशीनुसार संबंधितांनी सुशोभीकरणाची कामे करारातील अटी व शर्तींनुसार पूर्ण करणे आवश्यक आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मनपाकडून NOC (ना हरकत प्रमाणपत्र) प्राप्त करणे बंधनकारक असून, NOC मिळण्यापूर्वी कोणत्याही संस्था किंवा प्रतिष्ठानाने आपल्या नावाची जाहिरात अथवा फलक लावू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, काम पूर्ण होण्यापूर्वी जाहिरात लावलेली असल्यास ती दोन दिवसांच्या आत स्वतःहून काढून टाकावी, अन्यथा मनपा अतिक्रमण विभागाकडून संबंधित जाहिराती हटवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे. याशिवाय, ज्या संस्था किंवा कंपन्यांनी अद्याप सुशोभीकरणाचे काम सुरू केलेले नाही, त्यांनी मनपाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम सुरू करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील चौक व दुभाजकांचे सुशोभीकरण करताना अनधिकृत जाहिरातींमुळे होणारे विद्रूपीकरण रोखण्यासाठी मनपाने ही मोहीम हाती घेतली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत या नोटिसांमधून देण्यात आले आहेत.