धावत्या बसमधून २५ लाखांची रोकड लंपास करणारी टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ! संपूर्ण रक्कम व कार जप्त.
प्रतिनिधी दि. १६ जुलै : धावत्या लक्झरी बसमधून व्यापाऱ्याची २५ लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या चौघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपींकडून २५ लाखांची रोकड तसेच गुन्ह्यात वापरलेली मारुती डिझायर कार (क्र. MH-47-C-7877) असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगावातील सराफ व्यापाऱ्याकडे खासगी कुरिअर म्हणून काम करणारे नितीन पुरुषोत्तम वाणी हे ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपये रोख रक्कम घेऊन लक्झरी बसने निघाले होते. रात्री सुमारे ८.३० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापूर येथील एका हॉटेलवर बस जेवणासाठी थांबल्यानंतर त्यांनी पैशांची बॅग बसमध्येच ठेवून जेवणासाठी प्रवेश केला. दरम्यान, बसमधील प्रवाशांचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पैशांची बॅग लंपास केली. जेवण करून परत आल्यानंतर बॅग गायब असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यापाऱ्यास माहिती देण्यात आली. बस पुढे निघून गेल्यानंतर बॅगेचा शोध घेण्यात आला; मात्र ती न मिळाल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सराईत गुन्हेगार सोनू उर्फ राम भगवान सारावण (वय ३२) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार शेख रेहमान शेख निसार (वय ३३), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (वय ३८) आणि दशरथ सुरेश चौधरी (वय ३६) यांची नावे सांगितली. त्यानुसार चौघांनाही अटक करण्यात आली.
तपासात आरोपींकडून चोरीची २५ लाख रुपयांची संपूर्ण रोकड हस्तगत करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मारुती डिझायर कार (एमएच-४७-सी-७८७७) जप्त करण्यात आली असून एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहे.