राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक लाडवंजारी यांची महानगर जिल्हाअध्यक्ष पदी नियुक्ती..
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव महानगर जिल्हाध्यक्षपदी अशोक एस. लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुनील भुसारा व प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. अशोक लाडवंजारी यांची महानगराध्यक्षपदी ही दुसरी नियुक्ती असून, ते माजी मंत्री यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते नगरसेवक, जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य तसेच शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत होते. नाथ फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी गरजूंसाठी कपडे, ब्लँकेट, अन्नदान, शैक्षणिक साहित्य व साड्यांचे वाटप यांसारखे सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या नियुक्तीचे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव शहरात पक्षसंघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यावेळी यांचे विचार घराघरात आणि वॉर्डावॉर्डात पोहोचविण्यासाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.