जलसंधारणाचे मोठे पाऊल: मनपाच्या १५ शाळांमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’चे नियोजन अंतिम; लवकरच कामाला सुरुवात!
जळगाव (प्रतिनिधी): शहरातील भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. महापौर दीपमालाताई काळे आणि उपमहापौर मनोजभाऊ चौधरी, ताई समिती सभापती डॉक्टर चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज महानगरपालिकेच्या एकूण १५ शाळांना तज्ज्ञ पथकाद्वारे प्रत्यक्ष भेट देऊन, तेथे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ (छतावरील पावसाचे पाणी साठवणे) करण्यासाठीची आवश्यक मोजमापे (मेजरमेंट) घेऊन अंतिम नियोजन करण्यात आले. या भागातील शाळांमध्ये लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
या महत्त्वपूर्ण नियोजन दौऱ्यादरम्यान अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे तांत्रिक समन्वयक अमोल काळे, फील्ड कॉर्डिनेटर धीरज आंबिकर, रेखा वाघमारे, शुभम शिरतुरे तसेच ‘प्रॅक्टिकल ॲक्शन’ चे मार्गदर्शक अंकित लोकरे या तज्ज्ञ पथकाने सर्व शाळांची तांत्रिक पाहणी करून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी आवश्यक असलेली अचूक मोजमापे निश्चित केली.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती
या नियोजन मोहिमेला उपमहापौर मनोजभाऊ चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली व पुढील अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. याप्रसंगी महानगरपालिकेचे अधिकारी गणेश चौधरी सर आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर दीपमालाताई काळे व उपमहापौर मनोजभाऊ चौधरी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि मार्गदर्शनामुळे प्रशासकीय आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या या संयुक्त नियोजनाला मोठी गती मिळाली आहे.
या भागांतील शाळांची निवड
प्राथमिक टप्प्यात शहरातील नवी पेठ, शिवाजीनगर, सुप्रीम कॉलनी, तांबापुरा, आणि पिंप्राळा हुडको या परिसरातील महानगरपालिकेच्या शाळांची रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे.
या शाळांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी वाया न घालवता ते जमिनीमध्ये मुरवले जाणार आहे, ज्यामुळे परिसरातील भूजल पातळीत मोठी वाढ होण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे शाळा परिसर जलसमृद्ध होणार असून, विद्यार्थ्यांमध्येही जलसाक्षरतेचा संदेश जाणार आहे. या सर्व शाळांमध्ये अत्यंत दर्जेदार पद्धतीने हे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.