ताज्या बातम्या

अवघ्या दोन तासांत हरवलेल्या चिमुकल्याचा शोध; चोपडा पोलिसांची तत्परता पुन्हा सिद्ध


चोपडा | प्रतिनिधी:  ,“आपला लेकरू पुन्हा दिसेल का?” या एका प्रश्नाने चिंतेत बुडालेल्या कुटुंबासाठी बुधवारचा दिवस अखेर आनंदाचा ठरला. चोपडा शहरातील गणेश कॉलनी येथील अवघ्या सहा वर्षीय रुद्र संदीप चौधरी हा खेळता खेळता रस्ता चुकून हरवला; मात्र चोपडा शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत त्याचा सुखरूप शोध लागला आणि कुटुंबाचा जीव भांड्यात पडला.

बुधवारी (१ जुलै) सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास शोभाबाई कैलास चौधरी यांनी त्यांचा नातू रुद्र संदीप चौधरी (वय ६) हरवल्याची माहिती चोपडा शहर पोलीस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी तात्काळ शोध पथके रवाना केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आणि अत्यंत कौशल्याने तपासाची सूत्रे हलविण्यात आली.

 

पोलिसांच्या अथक प्रयत्नांना अवघ्या दोन तासांत यश आले. रुद्रचा सुखरूप शोध घेण्यात आला. त्याला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने स्वतःचे नाव रुद्र संदीप चौधरी (वय ६) असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची आजी शोभाबाई चौधरी यांना तातडीने बोलावून मुलाला त्यांच्या तसेच त्याच्या पालक, मामा व मामी यांच्या स्वाधीन करण्यात आले.रुद्रने पोलिसांना सांगितले की, तो खेळत खेळत रस्ता चुकला होता आणि त्याला घरी परतण्याचा मार्ग सापडत नव्हता. हे ऐकून उपस्थितांच्याही डोळ्यांत पाणी आले. दोन तासांच्या चिंतेनंतर आपल्या काळजाचा तुकडा सुखरूप परत मिळाल्याने कुटुंबीयांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांनी चोपडा शहर पोलिसांचे मनापासून आभार मानत त्यांच्या तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले.

या घटनेतून पुन्हा एकदा चोपडा शहर पोलिसांनी केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारे नव्हे, तर संकटाच्या क्षणी नागरिकांचा विश्वास जपणारे आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलवणारे ‘मित्र पोलीस’ असल्याचे सिद्ध केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button