Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

जळगावातील वीज समस्यांवर महापालिका-महावितरणची संयुक्त बैठक; तातडीने दुरुस्तीचे आदेश!

"नागरिकांचा वीज त्रास थांबवाच" : उपमहापौर मनोज चौधरींचा महावितरणला इशारा


जळगाव, प्रतिनिधी : शहरातील वारंवार होणारे वीज खंडित होणे, बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट्स, धोकादायक अवस्थेतील वीज केबल्स व उघड्या ट्रान्सफॉर्मरच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांच्या पुढाकाराने महापालिका व महावितरण (एमएसईबी) अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत शहरातील विविध वीज समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येऊन संबंधित विभागांना तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीस उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, नगरसेवक राहुल पाटील व गजानन मामा देशमुख उपस्थित होते. महावितरणतर्फे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र उन्हाळे, सहाय्यक अभियंता निलेश कुरसंगे, तर महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख मोरे साहेब व कनिष्ठ अभियंता सुमित पाटील उपस्थित होते.

बैठकीत लोकप्रतिनिधींनी शहरातील वीज पुरवठ्याशी संबंधित अनेक गंभीर प्रश्न अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. रात्रीच्या वेळी वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अनेक भागांमध्ये स्ट्रीट लाईट्स रात्री बंद आणि दिवसा सुरू असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये विजेच्या केबल्स धोकादायक अवस्थेत लोमकळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. अनेक ट्रान्सफॉर्मरच्या पेट्यांवर झाकण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, काही ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची बाबही बैठकीत मांडण्यात आली.

नेमखेडी सबस्टेशन परिसरात वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांवरही चर्चा झाली. त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता असल्याने तक्रारींचे निवारण वेळेत होत नसल्याची खंत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांनी सबस्टेशनमध्ये संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास अनेकदा फोन लागत नाही किंवा कर्मचारी प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारीही बैठकीत मांडण्यात आल्या.

शहरातील या सर्व समस्यांबाबत उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महावितरण आणि महापालिकेच्या विद्युत विभागाला तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करण्याचे आदेश दिले. नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

शहरातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिका व महावितरण यांच्यात समन्वय वाढवून नियमित आढावा बैठका घेण्याची गरजही बैठकीत व्यक्त करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button