Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एचपीव्ही लसीकरणासाठी जळगावात जनजागृती रॅली; महिलांच्या आरोग्याला प्राधान्य

कर्करोग प्रतिबंधासाठी पाऊल; एचपीव्ही लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद


प्रतिनिधी: जळगाव शहरात महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, जळगाव महानगरपालिकेच्या दवाखाना विभागाच्या वतीने Human Papillomavirus (HPV) लसीकरण जनजागृती अभियान उत्साहात पार पडले. “एचपीव्ही लस – गर्भाशयमुख कर्करोगापासून मुलींचे जीवन वाचवण्याचा नवा पर्याय” या संदेशाखाली छत्रपती शिवाजी नगर येथील डी.बी. जैन हॉस्पिटल परिसरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या रॅलीचा मुख्य उद्देश महिलांमध्ये Cervical Cancer (गर्भाशयमुख कर्करोग) या गंभीर आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हा होता. रॅलीदरम्यान घोषणाबाजी, फलक आणि माहितीपर संदेशांच्या माध्यमातून नागरिकांना कर्करोग प्रतिबंध, वेळेवर तपासणी आणि लसीकरणाचे महत्त्व प्रभावीपणे समजावून सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे एचपीव्ही जनजागृती विषयावर आयोजित रांगोळी स्पर्धा. सहभागी स्पर्धकांनी महिलांचे आरोग्य, कर्करोग प्रतिबंध आणि लसीकरणाचे महत्त्व यावर आधारित संदेश सर्जनशील पद्धतीने मांडले. उत्कृष्ट रांगोळी सादर करणाऱ्या प्रथम तीन स्पर्धकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमास मा. महापौर श्रीमती दिपमाला काळे, उपमहापौर श्री. मनोजभाऊ चौधरी, नगरसेवक श्री. विजय बांदल, नगरसेविका श्रीमती पुजा जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच उपायुक्त श्री. पंकज गोसावी, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी मान्यवरांनी एचपीव्ही लसीकरण हे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करत, गर्भाशयमुख कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारापासून संरक्षण मिळवण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. पालकांनी मुलींच्या आरोग्यास प्राधान्य देत लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
या रॅलीमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढली असून, नियमित तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचले. जळगाव महानगरपालिकेचा हा उपक्रम महिलांच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button