ताज्या बातम्या

उन्हाळ्याची तीव्र उष्णता ठरू शकते जीवघेणी; वेळेत घेतलेली खबरदारीच देईल सुरक्षितता.

डॉ. कमलेश तायडे यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा; उष्णतेची लाट ठरू शकते जीवघेणी


जळगाव, प्रतिनिधी – उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवस सलग तापमानात मोठी वाढ होणे, रात्रीही उकाडा कायम राहणे आणि शरीराला असह्य उष्णता जाणवणे ही उष्णतेच्या लाटेची प्रमुख लक्षणे मानली जातात. ही परिस्थिती केवळ त्रासदायक नसून जीवघेणीही ठरू शकते.

तज्ज्ञांच्या मते, उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होते. त्यामुळे रक्तदाब असंतुलित होऊन मेंदू, हृदय आणि मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटना च्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटा गंभीर आजार आणि मृत्यूचा धोका वाढवतात.

जळगाव येथील महादेव हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांनी सांगितले की, उष्णतेचा परिणाम सुरुवातीला साध्या लक्षणांमधून दिसतो. यामध्ये तीव्र तहान, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, चिडचिड, हात-पायांना गोळे येणे, मळमळ आणि अंग गरम होणे यांचा समावेश होतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ‘हीट एक्सॉश्शन’ आणि पुढे ‘हीट स्ट्रोक’चा धोका वाढतो. हीट स्ट्रोकमध्ये रुग्ण गोंधळलेला दिसणे, घाम थांबणे आणि बेशुद्ध पडणे अशी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.

ग्रामीण भागात शेतकाम, बांधकाम तसेच पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट यामुळे नागरिकांना अधिक काळ उन्हात राहावे लागते. अनेक ठिकाणी थंड जागा, पंखे किंवा पुरेशा पाण्याची सुविधा नसल्याने वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार आणि किडनीचे आजार असलेले रुग्ण अधिक धोक्यात येतात.

उष्णतेपासून बचावासाठी नियमित पाणी पिणे अत्यावश्यक आहे. तहान लागण्याची वाट न पाहता पाणी, ताक, लिंबूपाणी किंवा ओआरएसचे सेवन करावे. दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळावे आणि शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी कामे करावीत. सैल व फिकट रंगाचे कपडे वापरणे, डोक्यावर टोपी किंवा ओढणी ठेवणे आणि अधूनमधून सावलीत विश्रांती घेणेही गरजेचे आहे.

घरामध्ये उष्णतेपासून संरक्षणासाठी दिवसा खिडक्या व पडदे लावून ऊन आत येऊ देऊ नये. रात्री व पहाटे हवा खेळती ठेवावी. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना थंड व हवेशीर जागेत ठेवावे. तसेच गाडीत किंवा बंद खोलीत कोणालाही एकटे सोडू नये.

डॉ. तायडे यांनी पुढे सांगितले की, रुग्ण गोंधळलेला दिसणे, उलट्या होणे, चालता न येणे किंवा शुद्ध हरपणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. अशा वेळी रुग्णाला थंड जागी हलवून अंगावर थंड पाणी टाकावे किंवा ओले कापड ठेवून तातडीने रुग्णालयात दाखल करावे.

फक्त वैयक्तिक खबरदारी पुरेशी नसून गावपातळीवरही उपाययोजना आवश्यक आहेत. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विश्रांती केंद्रे, ओआरएसचा साठा तसेच आशा व आंगणवाडी सेविकांमार्फत जनजागृती आणि आरोग्य तपासणी केल्यास संभाव्य धोका कमी करता येतो.

दीर्घकालीन उपाय म्हणून गावोगावी झाडे लावण्यावर भर देणे आवश्यक आहे. झाडांमुळे सावली मिळते आणि वातावरणातील तापमान कमी करण्यास मदत होते.

उष्णतेची लाट ही सहन करण्याची नव्हे, तर वेळेवर ओळखून टाळण्याची आपत्ती आहे. योग्य वेळी पाणी, सावली आणि विश्रांती यांची काळजी घेतल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात, असे आवाहन डॉ. कमलेश तायडे यांनी केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button