Crimeजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव महापालिकेची ४१ कोटींची फसवणूक? नगरसेवकाची पोलिसांकडे फौजदारी तक्रार;

१९९७ च्या कंत्राटावरून अटलांटा कंपनी अडचणीत; ४१ कोटींच्या फसवणुकीची तक्रार


जळगाव, दि. — जळगाव महानगरपालिकेच्या रस्ते डांबरीकरण प्रकल्पात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आला असून, नगरसेवक अरविंद देशमुख यांनी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लिमिटेड व त्यांच्या संचालकांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात सुमारे ४१.३४ कोटी रुपयांच्या आर्थिक नुकसानीचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, सन १९९७ मध्ये जळगाव नगर परिषदेकडून संबंधित कंपनीला रस्ते डांबरीकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र कंत्राट घेतानाच कंपनीने चुकीची व भ्रामक माहिती देऊन काम पूर्ण करण्याची क्षमता नसताना कंत्राट मिळविल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच कंपनीने कंत्राटानुसार काम वेळेत पूर्ण न करता वारंवार मुदतवाढ घेतली आणि अखेरीस काम अपूर्णच ठेवले. महापालिकेकडून सुमारे १०.३५ कोटी रुपयांचा मोबिलायझेशन अॅडव्हान्स घेण्यात आला, मात्र तो प्रकल्पासाठी न वापरता अन्यत्र वळविल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. आवश्यक बँक गॅरंटी न देणे हेही हेतुपुरस्सर फसवणुकीचे लक्षण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय, सुमारे ४.७९ कोटी रुपयांची थकीत रक्कम कंपनीकडून दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आली असून, त्यावर २४ वर्षांच्या कालावधीत ९ टक्के चक्रवाढ व्याज धरल्यास एकूण नुकसान ४१.३४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.

नगरसेवक देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कंपनीने वारंवार सूचना व बैठकींकडे दुर्लक्ष करून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली आणि आर्थिक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८(४), ३१६(२) व ६१(२) नुसार गुन्हा नोंदवून सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच महापालिकेचे नुकसान वसूल करून आवश्यक असल्यास आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे जळगावात एकच खळबळ उडाली असून, पोलिस प्रशासन या तक्रारीवर कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button