जळगाव जिल्हा पोलीस दल पोलीस शिपाई भरती : अनुपस्थित उमेदवारांना अंतिम संधी; पुरुषांसाठी २० फेब्रुवारी आणि महिलांसाठी २१,२२ फेब्रुवारीपर्यंत चाचणी
उमेदवारांनी योग्य कारणासह दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक !
जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या १७१ पोलीस शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती २०२४–२०२५ प्रक्रियेअंतर्गत शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षा दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू असून ती २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे.
भरती प्रक्रियेनुसार, पुरुष उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीची अंतिम तारीख २० फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. तर महिला उमेदवारांसाठी ही प्रक्रिया २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षेस काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या पुरुष उमेदवारांना जिल्हा पोलीस दलाकडून अंतिम संधी देण्यात आली आहे. अशा उमेदवारांनी योग्य कारणासह दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ५.०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यानंतर येणाऱ्या पुरुष उमेदवारांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच, महिला उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी परीक्षा दिनांक २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित असून संबंधित सर्व महिला उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबतच्या सूचना काळजीपूर्वक वाचून दिलेल्या तारखेला व वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पार पडत असून, पोलीस दलात सेवा देण्याची संधी मिळवण्यासाठी उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.